अभिनेता अल्लू अर्जुनला अटक व सुटका

0
3

>> थिएटरबाहेरील चेंगराचेंगरीत महिलेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांची कारवाई; जामीन मंजूर

‘पुष्पा 2 : द रुल’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असलेला तेलगू सिनेमांमधील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला काल अटक करण्यात आली. हैदराबाद येथील संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यू प्रकरणी काल चिक्कडपल्ली पोलिसांंनी अटक केली होती. सुरुवातीला सत्र न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

4 डिसेंबर रोजी हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2 : द रुल’ या चित्रपटाचा प्रिमियर शो ठेवण्यात आला होता. त्यावेळी अल्लू अर्जुन अचानक संध्या थिएटरमध्ये पोहोचल्यामुळे एकच गोंधळ उडाला. चाहत्यांनी त्याला जवळून पाहण्यासाठी धावाधाव केली. परिणामी चेंगराचेंगरी होऊन त्यात 35 वर्षीय रेवती नामक महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच तिचा मुलगाही गंभीर जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर त्या महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुन आणि संध्या थिएटर मालकाच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर या प्रकरणी अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर काल त्याला अटक करण्यात आली. सत्र न्यायालयाने त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर अल्लू अर्जुनने जामीन मिळविण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली. तासाभरातच त्याला जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, मृत महिलेच्या पतीने यासंबंधीची तक्रार मागे घेण्याची तयारी चालवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अल्लू अर्जुनवर आरोप काय?
पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुनने संध्या थिएटरबाहेर उपस्थितीबद्दल आगाऊ माहिती न दिल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय संध्या थिएटरवर सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा आरोप ठेवण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर अल्लू अर्जुनने मृत महिला आणि तिच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.