‘राजा’ला वेषांतराचा शौक; पण टीका सहन होईना

0
4

>> काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधींची संसदेतील पहिल्याच भाषणात जोरदार फटकेबाजी; पंतप्रधानांवर टीका

केरळच्या वायनाड येथून मोठा विजय मिळवत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी ह्या खासदार म्हणून पहिल्यांदाच संसदेत पोहचल्या आहेत. यानंतर त्यांनी काल संसदेत आपले पहिले भाषण केले. त्यात त्यांनी संसदेतील रखडलेल्या चर्चेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडे टीका ऐकून घेण्याची हिंमत नसल्याचेही प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या. यासाठी त्यांनी एक उदाहरण देखील दिले. लहानपणी एक गोष्ट सांगितली जात असे की, राजा वेषांतर करून बाजारात आपल्यावरील टीका ऐकण्यासाठी जात असे. प्रजा माझ्याबद्दल काय बोलतेय? मी योग्य मार्गावर चालतोय की नाही? हे ऐकण्यासाठी राजा बाजारात जात असे; पण आजचा राजा वेषांतर तर करतो. वेषांतर करण्याचा त्यांना शौक तर आहे, पण त्यांच्याकडे ना लोकांमध्ये जाण्याची हिंमत आहे, ना टीका ऐकून घेण्याची, असा टोला प्रियांका गांधी यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदी यांना लगावला.

प्रियांका गांधी यांनी त्यांच्या भाषणात वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. देशातील राजकीय आणि सामाजिक स्थितीवर बोलताना आपल्या भाषणात प्रियांका गांधी म्हणाल्या की, आज जनतेला खरे बोलण्यापासून घाबरवले, धमकावले जात आहे. पत्रकार, विरोधी पक्षाचा नेता असो की एखाद्या विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी-कामगार संघटनांना गप्प बसवले जात आहे. कोणावर ईडी, तर कोणावर सीबीआय यांच्या माध्यामातून खोट्या केसेस दाखल करून त्यांना तुरूंगात टाकले जाते. विरोधकांना तुरूंगात टाकून त्रास दिला जात आहे. या सरकारने कोणालाही सोडले नाही. त्यांनी देशातील वातावरण भीतीने भरून टाकले आहे.
प्रियांका गांधींनी सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चा करण्याची हिंमत नसल्याचा दावा केला. हे (सत्ताधारी) चर्चेला आणि टीकेला घाबरतात. आम्ही किती दिवसांनी चर्चा करण्याची मागणी करत आहोत, पण यांच्यात चर्चा करण्याची हिंमतच नाही, असेही या म्हणाल्या.

पंतप्रधानांची सभागृहात नाममात्र उपस्थिती : प्रियांका
मी तर सभागृहात नवीन आहे, फक्त 15 दिवसांपासून येत आहे; पण मला नवल वाटते की 15 दिवसांत इतके मोठमोठे मुद्दे उपस्थित झाले; पण पंतप्रधान फक्त एका दिवशी 15 मिनिटांसाठी दिसले, असेही प्रियांका गांधी यांनी निदर्शनास आणून दिले.