राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणी सक्तीवसुली संचालनालय (ईडी) एकूण 19 मालमत्ता ताब्यात घेणार असून, त्यापैकी 11 जमिनी या हणजूण येथील असून, 8 जमिनी या आसगाव येथील आहेत. अवैध आर्थिक व्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली या जमिनी ताब्यात घेण्यासाठी ईडीने जाहीर नोटीस बजावली आहे.
जमीन घोटाळा प्रकरण उघड झाल्यानंतर ह्या जमिनी सरकारने तात्पुरत्या ताब्यात घेतल्या होत्या. या जमिनी आता जर कुणाच्या ताब्यात असतील, तर त्या ताबेदारांनी या जमिनींवरील आपला ताबा सोडावा व त्या इडीच्या ताब्यात द्याव्यात, असे सदर जाहीर नोटिसीतून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या जमिंनीपासून जर काही भाडे अथवा लीजची रक्कम मिळालेली असेल, तर ती ईडीकडे जमा करावी, असेही कळवण्यात आले आहे.
जमीन घोटाळा उघड झाल्यानंतर ह्या जमिनी 15 एप्रिल 2024 रोजी तात्पुरत्या ताब्यात घेण्यात आल्या होत्या. पुढील आदेशापर्यंत त्या जमिनींची विक्री करणे, अथवा त्या कुणाच्या नावावर करणे, अथवा गहाण ठेवणे तसेच या माहितीसंंबंधीचे प्रतिज्ञापत्र करणे असे काहीही करता येणार नसल्याचे सदर आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या मार्च महिन्यात ईडीच्या पणजी शाखेने अवैध आर्थिक व्यवहार प्रकरणी तक्रार केली होती.