>> प्रस्तावावर इंडिया आघाडीच्या 60 खासदारांनी केल्या स्वाक्षऱ्या
सध्या सुरू असलेले संसदेच्या अधिवेशनात राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. सभापती धनखड यांच्याविरोधात राज्यसभेच्या मुख्य सचिवांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. हा अविश्वास प्रस्ताव आणण्याची भारताच्या संसदीय इतिहासातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई ठरली आहे.
या अविश्वास प्रस्तावावर सुमारे 60 खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यात काँग्रेस, बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, तामिळनाडूचा द्रमुक आणि लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांचा समावेश आहे. जर हा प्रस्ताव मांडला गेला तर तो मंजूर करण्यासाठी या पक्षांना साधारण बहुमताची आवश्यकता असेल, परंतु 243 सदस्यांच्या सभागृहात त्यांच्याकडे आवश्यक संख्या नाही.
दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब
काल मंगळवारी दोन्ही सभागृहांचे कामकाज चालू झाले तेव्हा सत्ताधाऱ्यांनी जॉर्ज सोरोस यांचा तर विरोधीपक्षांनी उद्योगपती गौतम अदानी यांचा मुद्दा उचलून धरला. या मुद्द्यांवरूनच सत्ताधारी तसेच विरोधकांनी केलेल्या गोंधळानंतर आधी लोकसभेची तर नंतर राज्यसभेची कार्यवाही बुधवारपर्यंत स्थगित करण्यात आली. दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित केल्यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत अदानी यांच्याबाबतच्या मुद्द्यांवर सरकारकडून उत्तराची मागणी केली.
यापूर्वी काल सकाळी अदानी मुद्द्यावरून संसदेच्या संकुलात विरोधकांनी निदर्शने केली. दुपारी 11 वाजता दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाले. लोकसभेतील गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. 12 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज बुधवारपर्यंत तहकूब केले.
एनडीएकडे बहुमत ः रिजिजू
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी विरोधकांवर निशाणा साधताना, सभापतींविरोधात जो प्रस्ताव देण्यात आला आहे आणि ज्या 60 खासदारांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. त्या 60 खासदारांच्या कृतीचा मी निषेध करतो. एनडीएकडे बहुमत आहे आणि आम्हा सर्वांचा सभापतींवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. विरोधी ‘इंडिया’आघाडीने केलेली कृती अत्यंत खेदजनक असल्याचे रिजिजू यांनी म्हटले आहे.