>> आमदारकीच्या राजीनाम्याची भाजपकडून मागणी
भाजप युवा मोर्चाने काल पणजी शहरातून मोर्चा काढत अश्लील व्हिडिओमुळे वादग्रस्त ठरलेले काँग्रेसचे आमदार कार्लुस फरेरा यांच्या छायाचित्रांची काँग्रेस हाउसजवळ होळी केली. तसेच फरेरा यांच्या अश्लील व्हिडिओबरोबरच त्यांच्या सगळ्या कारनाम्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तसेच कार्लुस फरेरा यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अथवा काँग्रेस पक्षाने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी केली.
यावेळी बोलताना हळदोणा मतदारसंघाचे माजी आमदार व प्रदेश भाजप उपाध्यक्ष ग्लेन टिकलो यांनी, जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो फरेरा यांचाच खराखुरा अश्लील व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ ‘एडिट’ अथवा ‘मॉर्क’ केलेला नाही हे आता स्पष्ट झालेले आहे, असा दावा केला. जर कार्लुस फरेरा हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत तर त्यांनी ‘तो’ अश्लील व्हिडिओ वायरल करण्याची त्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पैसे का दिले. आणि आरोपीविरोधात तब्बल एका वर्षानंतर पोलिसांत का तक्रार केली, असा प्रश्नही टिकलो यांनी यावेळी पत्रकारांना माहिती देताना केला. आपण एका वर्षापूर्वी पोलिसात तक्रार केली होती हे त्यांचे म्हणणे खोटे असल्याचे टिकलो म्हणाले. कार्लुस फरेरा यांनी केलेल्या कृत्याचा गोवाभरातील लोकांनी निषेध नोंदवायला हवा. त्यांच्यापासून केवळ युवती व महिलांनाच नव्हे तर लहान मुले व पुरुष यांनाही धोका असल्याचे यावेळी टिकलो म्हणाले. त्यांनी केलेल्या कृत्यांची हळदोणा मतदारसंघात कुजबुज ऐकू येत असून दबक्या आवाजात लोक खूप काही त्यांच्याविषयी बोलत असल्याचे टिकलो पुढे म्हणाले.
ज्येष्ठ वकील व एकेकाळी राज्याचे ॲडव्होकेट जनरल असलेल्या कार्लुस फरेरा यांनी जे काही केलेले आहे ते अत्यंत लाजिरवाणे असे कृत्य असल्याचे ते म्हणाले. त्यांना आमदारपदी राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे टिकलो यांनी सांगितले.
भाजप युवा मोर्चा अध्यक्ष समीर मांद्रेकर यांनीही यावेळी बोलताना कार्लुस फरेरा यांना आता आमदारपदी राहण्याचा अधिकार नसून त्यांनी पदत्याग करावा, अशी मागणी केली. या घटनेपासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीच काँग्रेस नेते सरकारी नोकरी घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नीवर आरोप करीत सुटले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हे ब्लॅकमेलिंग ः फरेरा
कुलेश रौना नामक एका युवकाने आपला चेहरा मॉर्क करून एक अश्लील व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. पैशांसाठी सदर युवक आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार आमदार फरेरा यांनी पोलिसांत केली होती.