योगसाधना- 674, अंतरंगयोग- 260
- डॉ. सीताकांत घाणेकर
अनेक व्यक्ती दर दिवशी नित्यनेमाने विविध पद्धतीने देवाची पूजा करतात. पण प्रत्येक व्यक्तीने विचार करायला हवा, ही पूजा फक्त कर्मकांडात्मक नाही ना? त्या पूजेचा हेतू काय? भगवंताकडून काही मिळावे म्हणून तर मी पूजा करत नाही ना? मी भीतीपोटी पूजा करतो का? मी संपूर्ण समर्पित होऊन, विश्वास ठेवून पूजा करतो का? माझे मन पूजेत एकाग्र आहे का?
माणसाच्या जीवनातील काही रहस्ये आपण बघत आहोत. विचार, चिंतन, अभ्यास करण्यासारखे व्हॉट्सॲपवरील हे काही संदेश.
- ‘पूजा करण्याच्या आधी विश्वास ठेवायला शिका.’
- खरेच, या एका ओळीत भक्तियोगाचे गूढ रहस्य सामावलेले आहे. आपणातील अनेक व्यक्ती दर दिवशी विविध पद्धतीने देवाची पूजा करतात. त्या पूजेसाठी लागणारा वेळही वेगवेगळा असतो. काही मिनिटे किंवा काही तास. शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती. पण प्रत्येक व्यक्तीने विचार करायला हवा की ही पूजा फक्त कर्मकांडात्मक नाही ना? त्या पूजेचा हेतू काय? भगवंताकडून काही मिळावे म्हणून तर मी पूजा करत नाही ना? अथवा मी भीतीपोटी पूजा करतो का? मी संपूर्ण समर्पित होऊन, विश्वास ठेवून पूजा करतो का? माझे मन पूजेत एकाग्र आहे का? अशी विविध कारणे असू शकतात.
भक्तियोगशास्त्राप्रमाणे प्रत्येकाने ईश्वराला संपूर्ण समर्पित होऊन विश्वासाने पूजा करायला हवी. त्यामागे निस्वार्थ, निराकांक्ष, निरपेक्ष भाव अपेक्षित आहे. थोडा विचार केला तर लक्षात येईल की देव विश्वाची अनेक कामे बिनबोभाट मातेच्या प्रेमाने करत असतो. या सर्वात स्वतःची, कुटुंबाची, समाजाची अशी विविध कामे आहेत. एवढेच नव्हे तर जीवजंतू, कृमी-कीटक, पशुपक्षी, वनस्पती सर्वांनाच परमेश्वर सांभाळतो. कसलाही भेदभाव करत नाही. एवढेच नाही तर निसर्गाची पंचतत्त्वेदेखील सांभाळतो- पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश. त्याशिवाय करोडो व्यक्तींच्या शरीराचे व्यवहार, जीवनात केलेली कर्मेदेखील सांभाळतो. त्यांची सविस्तर नोंद ठेवतो. त्याप्रमाणे प्रत्येकाचे क्रियमाण, संचित व प्रारब्ध ही सर्वच आली.
सारांश, देव आपली कामे करतो त्याची यादी फार मोठी होईल. जशी आपली आई व इतर महिला घरची, कुटुंबाची अनेक कामे करतात, पण आपण याचा विचारदेखील करत नाही. मायेपोटी, प्रेमापोटी कर्तव्य म्हणून ही सर्व कामे या महिला जीवनभर करतच असतात. त्यांनी केलेली कामे दिसत नाहीत. कारण त्या मोबदला मागत नाहीत. कामगार जेव्हा तीच कामे करतात तेव्हा पैशांनी त्या कामाची किंमत कळते.
या सर्व गोष्टी माहीत असूनदेखील आजकाल सर्व लोक वृद्धापकालातील आपल्या मातापित्याची काळजी घेतीलच असे नाही. ती बिचारी विश्वासाने, आशेने आपल्या मुलांकडून अपेक्षा ठेवतात. या सर्व मुद्द्यांचा सारांश एकच- पूजा करण्याच्या आधी भगवंतावर विश्वास ठेवायला शिका. कृतज्ञतेपोटी समर्पित होऊन पूजा करा.
बालपणी संत नामदेवाची कथा ऐकलेली आठवते. नामदेवाचे वडील मंदिरात पुजारी होते. ते रोज तिथे पूजा करीत असत. एक दिवस त्यांना बाहेर दुसऱ्या गावी जायचे होते म्हणून त्यांनी नामदेवाला देवाची पूजा करायला सांगितले. आईने सर्व तयारी करून दिली. पूजेची सामग्री व नैवेद्य घेऊन बाळ नामदेव मंदिरात गेला. वडील पूजा करताना त्याने बघितले होते, त्याप्रमाणे त्याने अगदी प्रेमाने, श्रद्धेने पूजा केली. शेवटी विठ्ठलाला नैवेद्य दाखवला व तो विठ्ठल येऊन नैवेद्य खाणार म्हणून वाट बघू लागला. पण ती मूर्ती काही जागची हलेना. नामदेवाने विठ्ठलाला अनेक तऱ्हेने विनवले, पण देव काही जेवेना. त्याला वाटले की आपली काहीतरी चूक झाली असेल म्हणून देव जेवायला येत नाही. शेवटी बालमनच ते, अंततः त्याने देवाला सांगितले की, तू जेवला नाहीस तर मी माझे डोके तुझ्या पायाशी आपटून जीव देईन. विठ्ठलाचा प्रतिसाद नाही म्हणून त्याने डोके आपटायला सुरुवात केली आणि काय चमत्कार! विठ्ठल प्रगट होऊन जेवू लागला. बाळाला धन्यता वाटली आणि ताट घेऊन तो घरी परतला.
त्याला उशीर झाल्यामुळे आई घरी चिंता करीत बसली होती. तिने विचारल्यावर नामदेवाने सर्व घटना सांगितली. आईचा विश्वासच बसेना. रात्री वडील घरी आल्यावर त्यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी म्हटले, ‘बाळा, देव केव्हाही नैवेद्य खात नाही. आपली कृतज्ञता म्हणून आपण नैवेद्य देवाला दाखवतो. आपण तो नैवेद्य घरी आणून ग्रहण करतो.’
शेवटी अशा कथा बोधासाठी असतात. त्यांची सत्यसत्यता पाहायची नसते. पण आम्हाला बालपणात छोट्या नामदेवाचे कौतुकच वाटायचे- ‘किती भाग्यवान बालक हा! देवाने त्याच्या हट्टाला व विनंतीला मान देऊन नैवेद्य ग्रहण केला.’
या अशा गोष्टींचा सारांश म्हणजे- पूजा करण्याच्या आधी विश्वास ठेवायला शिका. आहे आपला एवढा विश्वास व श्रद्धा? चिंतनाचा व संशोधनाचा विषय आहे.
2) बोलण्याच्या आधी ऐकायला शिका.
- हा सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्यातील बहुतेकजण दुसऱ्याचे म्हणणे ऐकूनच घेत नाहीत. दुसरा थोडे जरी बोलला तर आपण उत्तर द्यायला, आपले मत सांगायला सुरुवात करतो. तो जर आपल्यापेक्षा लहान असला तर तो काही बोलू शकत नाही. याउलट वयस्क असला तर कदाचित समजावून सांगेल की आपण माझे सगळे ऐकून घ्या व मग आपले मत द्या.
वैद्यकीय व्यवसायात ही गोष्ट फार महत्त्वाची असते. पुष्कळवेळा डॉक्टरसाठी काही पेशंट थांबलेले असतात. त्यामुळे डॉक्टरना तेवढा वेळ नसतो. म्हणून थोडे ऐकले की ते लगेच रोगाचे निदान करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे निदान चुकण्याची शक्यता जास्त असते.
हल्ली तर काही डॉक्टर पेशंटचे सगळे म्हणणे न ऐकता विविध तऱ्हेच्या तपासण्या करायला सांगतात. खरे म्हणजे पेशंटचे संपूर्ण म्हणणे ऐकले तर कदाचित तेवढ्या चाचण्या करायची गरजही नसेल.
अनेक क्षेत्रांत असे घडू शकते. काही न्यायाधीश वकिलाचे सगळे म्हणणे न ऐकताच निकाल सांगतात. न्यायालयात जाणाऱ्या व्यक्तीवर मग अन्याय होण्याची शक्यता असते. कुटुंबातदेखील जर कुणीही घरी उशिरा पोचला अथवा मुले नापास झाली तर वयस्क काहीवेळा ऐकून न घेता आपली मते देतात. त्यामुळे कुटुंबातील वातावरण बिघडू शकते.
3) खर्च करण्याच्या आधी कमवायला शिका.
- लहानपणी आपण काही कमवत नाही. पालक जसे पैसे देतात तसा आपण पैसा खर्च करतो. आपण क्षणभरदेखील विचार करत नाही की आपल्या मालकाला पैसे कमविण्यासाठी किती कष्ट सोसावे लागले असतील. अनेक मुले अशा अविचारामुळे पैशांची उधळपट्टी करताना दिसतात. अनेकवेळा पालकच त्यांच्या अशा वागण्याला जबाबदार असतात. मुलांना बालपणापासूनच काटकसरीचे धडे द्यायला हवेत.
अनेकवेळा असे दृष्टिक्षेपात येते की ही मुले जेव्हा स्वतः कमवायला लागतात तेव्हा त्यांना कष्टाचे महत्त्व कळते व ती आपोआप काटकसर करू लागतात. एरव्हीदेखील आपणातील अनेकजण काटकसरीकडे लक्ष देत नाही. उदा. दिवे व पंखे चालूच ठेवणे (गरजेचे नसले तरी), नळाचे पाणी वाहतच ठेवणे वगैरे.
वेळेचे महत्त्व काहीजणांना ठाऊक नसते. तसेच कुठल्याही समारंभाला गेलो तर अनेकजण अन्न तसेच ताटामध्ये टाकून उठतात. खरे म्हणजे ‘अन्न हे पूर्णब्रह्म आहे.’ ते वाया केव्हाही घालवू नये. आपल्या गरजेप्रमाणे हवे तेवढे अन्न ताटामध्ये घ्यावे. आमच्या बालपणी अन्न वाया जात नाही ना? याची दक्षता घरातील ज्येष्ठ व्यक्ती घेत असे. आजच्या काळात अनेकांना एक वेळचेदेखील जेवण मिळत नाही. अशावेळी अन्नाची नासाडी करणे हा गुन्हाच नाही तर पाप आहे.
यातील प्रत्येक मुद्यावर प्रत्येक व्यक्तीने विचार करून त्याप्रमाणे आचरण करावे. संदेश फक्त पुढे पाठवत राहू नये.