पुराव्यांशिवाय मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नीवर विरोधकांकडून नाहक आरोप : फळदेसाई

0
6

>> नोकरी घोटाळ्यावरून बेछूट आरोपांप्रकरणी ‘आप’सह विरोधकांवर टीकास्त्र

राज्यातील विरोधी पक्षांचे काही नेते हल्लीच्या काळात उघडकीस आलेल्या काही घोटाळ्यांप्रकरणी मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नीवर कोणतेही पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप करू लागले आहेत. भाजप सरकार सरकारला बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नीला विरोधक लक्ष्य करू लागले आहेत, असा आरोप समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

या पत्रकार परिषदेला भाजपचे आमदार संकल्प आमोणकर, केदार नाईक व पक्षाचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी हे उपस्थित होते.
विरोधी पक्षांचे काही नेते सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नीवर बिनबुडाचे आरोप करीत सुटले असून, हे आरोप करताना ते नेते अगदी खालच्या पातळीवर येऊ लागले असल्याचे सुभाष फळदेसाई म्हणाले. विशेष म्हणजे त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसताना विरोधक बेछुटपणे आरोप करीत सुटले आहेत. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व त्यांच्या पत्नीवर गोव्यात झालेल्या सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणात गंभीर स्वरुपाचे आरोप केले. कोणतेही पुरावे नसताना त्यांनी हे आरोप केल्याचे फळदेसाई म्हणाले.
सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणात राज्य सरकारने तातडीने हालचाली करीत त्यात सहभाग असलेल्या सर्वांना अटक केली आहे. त्यात भाजपशी संबंधित काही आरोपींनाही पकडण्यात आले असून, एकाही आरोपीला पाठीशी घालण्यात आले नसल्याचे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर यापुढे सरकारी नोकरी घोटाळा होऊ नये यासाठी प्रमोद सावंत सरकारने कर्मचारी निवड आयोगातर्फे नोकरभरती सुरू केली असल्याचे फळदेसाई यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी बोलताना संकल्प आमोणकर म्हणाले की, हरियाणापाठोपाठ महाराष्ट्र राज्यातही विरोधकांचा पराभव झालेला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे आणि म्हणूनच सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणी ते मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नीवर नाहक आरोप करू लागले आहेत, असा दावा त्यांनी केला.
यावेळी बोलताना पक्षाचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका विरोधकांनी घेतला असून, त्यामुळेच ते मुख्यमंत्र्यांवर व त्यांच्या पत्नीवर विनाकारण आरोप करीत सुटले आहेत. नोकरी घोटाळा प्रकरणाचे तपासकाम चालू असताना विरोधक दररोज पत्रकार परिषदा घेऊन सरकारवर का आरोप करीत आहेत, असा सवालही त्यांनी केला.