>> आस्थापनांविरुद्ध गुन्हे नोंदवले; राज्य सरकारची गोवा खंडपीठात माहिती
हणजूण येथील कर्णकर्कश संगीत (ध्वनिप्रदूषण) प्रकरणी दोन आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली असून, एका आस्थापनाने मान्यता न घेता मोठ्या आवाजात संगीत वाजविल्या प्रकरणी स्पीकर व इतर वाद्ये पोलिसांनी जप्त करून त्या आस्थापनांच्याविरोधात ध्वनिप्रदूषण प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काल दिली.
गोवा खंडपीठात हणजूण येथील ध्वनिप्रदूषण अवमान याचिकेवर काल सुनावणी घेण्यात आली. राज्य सरकारच्यावतीने ध्वनिप्रदूषण प्रकरणी एकूण तीन आस्थापनांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात, दोन आस्थापनांना नोटीस बजावून 2 दिवसांत स्पष्टीकरण देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यांच्या उत्तरानंतर त्या आस्थापनांवर कारवाई केली जाणार आहे.
एका आस्थापनाने संगीत वाजविण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले आहे. तेथील स्पीकर व इतर यंत्रसामग्री ताब्यात घेऊन त्या आस्थापनाच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना संगीत वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती देविदास पांगम यांनी न्यायालयाला दिली.
राज्य सरकारने ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 3 आस्थापनांवर कारवाई सुरू केली आहे. दोन आस्थापनांत योग्य डेसिबल पातळीपेक्षा जास्त मोठ्याने संगीत वाजविण्यात आले आहे. तिसऱ्या प्रकरणात, जिथे कोणत्याही परवानगीशिवाय मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात होते. दरम्यान, ॲमिकस क्युरी यांनी नरकासुर उत्सवात रात्रीच्या वेळेचे झालेले ध्वनिप्रदूषण याविषयी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या याचिकेवरील पुढील सुनावणी शुक्रवार दि. 13 डिसेंबर रोजी होणार आहे.