राज्यसभेच्या सभापतींविरुद्ध विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार

0
5

>> असा पक्षपाती अध्यक्ष कधीच पाहिला नाही; खासदार दिग्विजय सिंह यांचा गंभीर आरोप; स्थगन प्रस्ताव न मांडताच ‘सोरॉस’ विषयावर चर्चा

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. या प्रस्तावावर विरोधी पक्षांच्या 70 खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. काँग्रेससह इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसनेही अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. आम आदमी पक्षाकडूनही अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. राज्यसभेचे सभापती म्हणून जगदीप धनखड हे पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ते विरोधी पक्षांच्या खासदारांना बोलण्याची संधी देत नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या 10व्या दिवशीही ‘अदानी’ मुद्द्यावरून बराच गदारोळ झाला. भ्रष्टाचारप्रकरणी अदानींविरोधात अमेरिकेतील न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंट केले आहे. एका बाजूला अदानीच्या मुद्द्यावर संसदेत कोणत्याही चर्चेला परवानगी दिली जात नसताना, दुसऱ्या बाजूला काल स्थगन प्रस्ताव न मांडताच भाजपच्या खासदारांना ‘सोरॉस’ विषयावर बोलण्याची परवानगी देण्यात आली. अमेरिकेतील अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरॉस यांच्या राहुल गांधींशी असलेल्या कथित लागेबांध्याचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला.

काल राज्यसभेत सत्ताधारी भाजपकडून सोरॉस विषयावर चर्चेसाठी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली, त्याला सभापतींनी परवानगी दिली नाही; मात्र त्या विषयावर केंद्रीय आरोग्यमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अन्य भाजप खासदारांनी भाष्य केले. त्याला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी आणि जयराम रमेश यांनी आक्षेप घेतला.
सोरॉस विषयावरील चर्चेसाठी स्थगन प्रस्तावाला परवानगी दिलेलीच नाही, तर मग राज्यसभेत त्यावर चर्चा का, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जगदीप धनखडे भाजपच्या बाजूने पक्षपाती असल्याचा आरोप केला. त्यामुळे राज्यघटनेच्या कलम 67 (बी) अंतर्गत विरोधी पक्ष त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत.

सोमवारी राज्यसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. भाजपच्या खासदारांनी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर विदेशी संस्था आणि लोकांच्या माध्यमातून देशाचे सरकार आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. शून्य प्रहरात भाजप खासदारांनी काँग्रेसला येणाऱ्या विदेशी निधीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली. राज्यसभेतील नेते जे. पी. नड्डा यांनी फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया-पॅसिफिक (एफडीएल-एपी) संस्था आणि जॉर्ज सोरोस यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित केला. या फोरमला जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करायचे आहे आणि त्यांना राजीव गांधी फाऊंडेशनकडून आर्थिक मदत मिळते, असा दावा त्यांनी केला.
काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी अदानी समूहाशी संबंधित मुद्दा उपस्थित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. भाजपला अदानी प्रकरणावरून लक्ष हटवायचे आहे, असा आरोप काँग्रेसने केला.

केवळ अदानींना वाचवण्यासाठी खटाटोप : सिंह

जगदीप धनगड यांनी सोमवारी अत्यंत पक्षपाती पद्धतीने सभागृह चालवले, असा माझा आरोप आहे. मोदी सरकार केवळ अदानींना वाचवण्यासाठी आणि मूळ मुद्द्यांवर दुसरीकडे लक्ष भरकटवण्यासाठी असे प्रयत्न करत आहेत, हे सर्वांना माहीत आहे. मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात इतका पक्षपाती सभापती पाहिला नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांनी केला. सभागृह नियमांतर्गत ते आम्हाला अदानी मुद्द्यावर बोलण्यापासून रोखत आहेत, पण सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना सोरॉस विषयावर बोलू देत आहेत, असेही सिंह म्हणाले.