देशप्रेमी नागरिक समिती पणजीतर्फे मंगळवार दि. 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी 3.30 वाजता येथील आझाद मैदानावर बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेधार्थ धरणे आणि मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आझाद मैदानावरील धरणे आंदोलनानंतर बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी स्थानिक सरकारी यंत्रणा आणि गोवा मानवाधिकार आयोग यांना निवेदने सादर केली जाणार आहेत. बांग्लादेशात हिंदूंवर करण्यात येणाऱ्या अत्याचारांविरुद्ध जागतिक मानवाधिकार संघटनांनी अवाक्षर काढलेले नाही. या धरणे आंदोलनात विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. बांग्लादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचार रोखण्यासाठी आवश्यक ती पाऊल उचलावीत आणि वैश्विक सहमती बनवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे, अशी मागणी निवेदनातून केली जाणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे मोहन आमशेकर यांनी दिली.