मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याकडून विश्वास व्यक्त; दोनापावला येथे आयोजित शालेय शिक्षणातील बदलावरील राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप
राज्यात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ही केवळ पॅशन नसून, ते एक मिशन आहे. राज्यात एनईपीची अंमलबजावणी ज्या पद्धतीने होत आहे, त्याचा विचार केल्यास भविष्यात गोवा राज्य एनईपीच्या अंमलबजावणीत देशासमोर आदर्श होऊ शकतो, असे प्रतिपादन जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल केले.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) शालेय शिक्षणातील बदल आणि नवीन राज्य अभ्यासक्रमाचा आराखडा या विषयावर दोनापावला येथील राजभवनच्या दरबार सभागृहात आयोजित केलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालनालयाचे संचालक शैलेश झिंगडे, गोवा शालांत बोर्डाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये, गोवा समग्र शिक्षाचे डॉ. शंभू घाडी, एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगावकर, प्रो. इंद्रायणी भादुरी, प्रो. रामाकृष्णाराव आदी मान्यवर उपस्थित होते.
गोव्याने शैक्षणिक क्षेत्रात जी प्रगती केलेली आहे, त्यामध्ये सर्व घटकांचे योगदान आहे. या परिसंवादातून जे ज्ञान आपण घेतले आहे, त्या ज्ञानाचे उपयोजन करण्यासाठी सहभागींनी सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. एनईपीच्या माध्यमातून आपण भविष्यातला समाज कसा असू शकतो, ते आपण आता ठरवू शकतो आणि त्यासंदर्भात कामही करू शकतो, असेही शिरोडकर म्हणाले.
महाराष्ट्र, आसाम, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांमधील नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा कशा पद्धतीने राबविला जात आहे, याची माहिती अनुक्रमे कमलादेवी आवटे, डॉ. निरादा देवी, आलोक शर्मा आणि रोहित मेहता यांनी या परिसंवादावेळी दिली.
प्रा. गोविंदराज देसाई यांनी या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाविषयीचा अहवाल सादर केला. गोवा समग्र शिक्षाचे डॉ. शंभू घाडी यांनी स्वागत केले. सहयोगी प्राध्यापिका करुणा सातार्डेकर यांनी सूत्रसंचालन केले. एससीईआरटीच्या प्रशासकीय विभागाच्या संचालक सरिता गाडगीळ यांनी आभार मानले.
पाच हजार विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
‘पीएम विद्या’ अंतर्गत सुरू असलेले डीटीएच चॅनेल्स, एससीईआरटीचे यूट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून राज्यातील पाच हजार विद्यार्थी व शिक्षकांनी शालेय शिक्षणातील बदल आणि नवीन राज्य अभ्यासक्रमाचा आराखडा या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा लाभ घेतला.