जुने गोवेतील घटना; तक्रारीनंतर संशयितांना अटक
दुचाकीवरुन जाणाऱ्या एका युवतीचा पाठलागत करत तिचा विनयभंग केल्या प्रकरणी बंगळुरू-कर्नाटकातील 4 जणांना जुने गोवे पोलिसांनी काल अटक केली. अस्लम खान (31), राघवेंद्र आनंदा (33), संतोष कुमार एन. (32), राघवेंद्र एच. (42) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
जुने गोवे येथील कदंब बगलमार्मावरील साईबाबा मंदिर ते मेरशी उड्डाण पुलाच्या दरम्यान ही विनयभंगाची घटना गुरुवारी (दि. 5) रात्री 9.30 च्या सुमारास घडली. तक्रारदार युवती आपल्या मित्रासमवेत पणजीला येत असताना वाटेत साईबाबा मंदिरापासून टोयाटो कारमधील (क्र. केए-05-एनसी-9929) चार व्यक्तींनी तिचा पाठलाग सुरू करून छेडछाड करण्यास सुरुवात केली. तसेच, अश्लील शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली. पुढे मेरशी उड्डाण पुलाजवळ चार जणांनी आपली कार तिच्या दुचाकीसमोर उभी करून तिला अडवले. त्यानंतर चारही जण कारमधून खाली उतरले आणि युवतीला उद्देशून अश्लील शब्द वापरण्यास सुरुवात केली. तसेच, तिला शारीरिक स्पर्शही केला, तिच्या मित्राला अपशब्द सुध्दा वापरले. त्यानंतर चारही जणांनी तक्रारदार आणि तिच्या मित्राला मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय संशयितांनी दुचाकी वाहन आणि मोबाईलची नासधूस केली. युवतीने या प्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर जुने गोवे पोलिसांनी कारवाईत चौघांनाही अटक केली. या प्रकरणी उपनिरीक्षक जस्विता नाईक तपास करीत आहेत.