>> व्हिडिओ कॉल करत बनवला अश्लील व्हिडिओ
>> गुन्हा अन्वेषणकडून ओडिसातील एकाला अटक
गोव्यातील एका आमदाराला व्हिडिओ कॉल करून तो रेकॉर्ड करत नंतर तो एका अश्लील व्हिडिओशी जोडून सदर आमदाराला बदनामीची धमकी देत 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने कुकेश रौता (रा. ओडिसा) याला काल अटक केली.
या प्रकरणात 2 डिसेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. संशयिताने तक्रारदार आमदाराशी त्याच्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. तक्रारदाराच्या माहितीनुसार, संशयिताने सदर व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ नंतर अश्लील व्हिडिओंशी जोडला. यानंतर संशयिताने तक्रारदाराकडून पैसे उकळण्यासाठी सदर व्हिडिओ तक्रारदाराच्या मोबाईलवर पाठवला. पैसे न दिल्यास सदर व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. त्यानंतर तक्रारदार आमदाराने 55 हजार रुपये संशयित कुकेश रौता याच्या बँक खात्यात हस्तांतरित केले. आणखी खंडणीसाठी संशयिताने तक्रारदाराकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली, ती न दिल्यास सदर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने कारवाई करत ओडिसातील रहिवासी असलेल्या कुकेश रौता याला अटक केली असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे. आतापर्यंत अशा प्रकारे त्याने आणखी काहीजणांकडून 5 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे.