>> सीतारमण व रुपाणी केंद्रीय निरीक्षक
>> गुरूवारी होणार शपथविधी
महाराष्ट्रात उद्या बुधवारी 4 डिसेंबर रोजी भाजप नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत भाजपचा विधिमंडळ नेता निवडला जाणार आहे. भाजपने सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. रुपाणी आणि सीतारामण उद्या बुधवारी मुंबईत भाजपच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. या बैठकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी निवडलेल्या उमेदवाराचे नाव दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना कळवले जाईल. त्यानंतर या निरीक्षकाकडून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.
गुरूवारी शपथविधी
भाजपने शपथविधी समारंभ गुरूवारी 5 डिसेंबर रोजी आयोजित करण्याची घोषणा केली. महायुतीतील तीनही पक्षांना किती मंत्रिपदे मिळावीत, खातेवाटप कसे असावे आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडून मंत्रीपदांसाठी कोणाची निवड केली जाणार, या बाबींवर शिंदे, फडणवीस व पवार यांच्यात काल सोमवारपासून चर्चा सुरू होणार होती. परंतु, एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी सर्व बैठका रद्द केल्या. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील चर्चेतून मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपावरून तोडगा निघाला नाही तर पुन्हा दिल्लीत चर्चेची आणखी एक फेरी होण्याची शक्यता आहे. उद्या बुधवारी 4 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करण्याते यणार आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास निश्चित झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
आधी मुख्यमंत्रीपद व आता राज्याच्या गृहमंत्रीपदावरून भाजप व शिवसेनेत (शिंदे) यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असून त्यांच्या नावावर भाजप पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी झाले असले तरी गृहखाते मिळावे, या मागणीवर ते ठाम आहेत. मात्र भाजपची त्याला तयारी नाही.