सनबर्न; आमदारांचा विरोध, पंचायतीचा पाठिंबा

0
2

>> धारगळ येथे विरोधासाठी नागरिकांचा जमाव

>> संगीत महोत्सवासंबंधी आज ग्रामपंचायतीची बैठक

धारगळ येथे सनबर्न संगीत महोत्सवासाठी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी जोरदार विरोध दर्शवताना केवळ धारगळच नव्हे तर पेडणे तालुक्यातील नागरिकांचा सनबर्नला विरोध आहे. जर नागरिकांचा विरोध असेल तर त्या नागरिकांसोबत आपण आहे. त्यामुळे आपण सनबर्नविरोधात रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांसोबत असल्याचे सांगितले. तर त्याचवेळी धारगळ येथे होणाऱ्या सनबर्नला धारगळ पंचायतीने पाठिंबा दर्शवला आहे. काल सनबर्नविषयक झालेल्या बैठकीत धारगळचे सरपंच, पंच व स्थानिक लोकांनी समर्थन दिले. स्थानिकांनी समर्थन करताना आर्थिक बाजू तसेच एक मनोरंजन कार्यक्रम होणार आणि स्थानिक लोकांना रोजगार संधी मिळणार असल्याने पाठिंबा असल्याचे सांगितले.

सनबर्नच्या विरोधात पंचायत कार्यालयासमोर आयोजित केलेला जाहीर सभेत आमदार आर्लेकर बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या नागरिकांसोबत आमदार प्रवीण आर्लेकर हेही उपस्थित होते. आमदार आर्लेकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, पंच, भाजप कार्यकर्ते नागरिक यांना आमंत्रित करून जाहीर सभा घेतली. त्यामध्ये मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, मांद्रे माजी सरपंच ॲड. अमित सावंत, माजी सरपंच बाळा ऊर्फ प्रशांत नाईक, पंच, उपसरपंच नागरिक उपस्थित होते.

यावेळी आर्लेकर यांनी, धारगळ मध्ये आम्हाला सनबर्न नकोच आहे. आणि तो आम्ही होऊ देणार नाही. ही आमची संस्कृती नव्हे. त्यामुळे सरकारनेही फेरविचार करून अशा महोत्सवाला परवानगी देऊ नये अशी जोरदार मागणी केली. तसेच धारगळ पंचायत मंडळानेही जनतेच्या भावनांचा विचार करून परवानगी नाकारावी असेही आवाहन केले.

या सभेला काँग्रेसचे ॲड. जितेंद्र गावकर, ॲड. प्रसाद शहापूरकर, आम आदमी पक्षाचे पुंडलिक धारगळकर, भारत बागकर, तसेच सरपंच, पंच, उपसरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही होता. मात्र या सभेला धारगळ पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पच भूषण ऊर्फ प्रदीप नाईक, अनिकेत साळगावकर वगळता सत्तारूढ गटातील एकही पंच सदस्य उपस्थित नसल्यामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली. दरम्यान, आज सोमवारी होणाऱ्या धारगळ पंचायतीच्या विशेष बैठकीमध्ये सनबर्न महोत्सवाला परवानगी देण्याबाबत चर्चा होणार आहे. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी थेट इशारा दिला आहे. धारगळ येथे होणाऱ्या नियोजित सनबर्नला विरोध करण्यासाठी पेडण्यातील हजारो नागरिक काल रविवारी पंचायत कार्यालयासमोर जमले होते. बंदोबस्तासाठी पोलीसही मोठ्या प्रमाणात तैनात केले होते. मोप पोलीस स्थानकाचे निरीक्षक नारायण चिमुलकर, पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सचिन लोकरे यांच्यासह उपअधीक्षक आशिष शिरोडकर हे जातीनिशी उपस्थित होते.

उपस्थित स्थानिकांनीही जर सनबर्न महोत्सवामुळे गावाला मदत होणार असेल तर आम्ही महोत्सवाला पाठिंबा देऊ असे स्पष्ट केले. यावेळी स्थानिक नागरिक सर्वेश कारापुरकर यांनी आम्ही स्थानिक पंचायतीकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या मागण्या जर पंचायत पूर्ण करणार असेल तर सनबर्नला आमचा विरोध नसल्याचे सांगून स्थानिक लोकांना रोजगार की गावातील कचरा व्यवस्थापनासाठी संबंधित सहकार्य करत असतील तर आम्ही सनबर्नला पाठिंबा देऊ असे सांगितले.

धारगळ पंचायतीला इशारा

यावेळी बोलताना आमदार आर्लेकर यांनी, आपण सत्तेत असूनही सनबर्नविषयी आपल्याला विश्वासात घेतले नाही व सनबर्न आयोजनाविषयी कल्पना दिलेली नाही. त्यामुळे फक्त धारगळमध्ये नाही, तर पूर्ण पेडणे तालुक्यात आम्हाला सनबर्न नको. त्यामुळे आपण लोकांसोबत रस्त्यावर उतरलो असल्याचे सांगून आज सोमवारी होणाऱ्या पंचायत बैठकीत जर पंचायत मंडळाने सनबर्न महोत्सवाला परवानगी दिली तर काय ते दाखवून देईन असा इशारा दिला.

समर्थनार्थ बैठक

दुसऱ्या बाजूने सनबर्नला पाठिंबा देण्यासाठी पंचायत मंडळाचे सत्तारूढ गट आणि नागरिक, टॅक्सी व्यावसायिकांचीही एक जाहीर सभा कामाक्षी सभागृह धारगळ येथे झाली. यावेळी उपस्थितांनी सनबर्नला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे पेडण्यात सनबर्नवरून दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.
यावेळी बोलताना सरपंच सतीश धुमाळ यांनी, जर लोकांना सनबर्न महोत्सव हवा असेल व सनबर्नमुळे गावचे भले होणार असेल तसेच कोणताही गैरप्रकार होणार नसेल तर आम्ही सनबर्नला पाठिंबा देऊ असे सांगितले.

‘सनबर्न’प्रकरणी आज धारगळला बैठक

सनबर्न संगीत महोत्सव धारगळ येथे आयोजित करण्यात स्थानिक लोकांच्या विरोध वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी धारगळ पंचायत मंडळाचा पाक्षीक बैठक होऊ घातली असून यावेळी स्थानिकांकडून पंचायतीवर दबाव वाढण्याच्या भीतीने पेडणे पोलिसानी जमावबंदी आदेश जारी केला आहे. दरम्यान, पोलिसानी जमावबंदी आदेश काढल्याने धारगळमधील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. पेडणे पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की धारगळ येथे सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवाला काही ग्रामस्थांचा विरोध असून ते हा महोत्सव होऊ नये यासाठी बेकायदेशीर कारवाया करण्याची भीती आहे. ग्रामस्थांनी अशा कारवाया करू पाहणाऱ्यांपासून दूर रहावे. पेडणे पोलिसानी भारतीय नागरी संहिता कलम 168 अंतर्गत हा जमावबंदी आदेश जारी केला आहे.