55 व्या इफ्फीचा दिमाखात समारोप; वेस्ता आणि लेवा ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; क्लेमेंट फेवो सर्वोत्कृष्ट अभिनेता
55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सुवर्णमयूर पुरस्कार लिथुआनिया देशातील ‘टॉक्सिक’ या चित्रपटाला प्राप्त झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक सॉल ब्लियुवेट यांना सुवर्णमयूर, प्रमाणपत्र आणि 40 लाखांचे रोख पारितोषिक स्वीकारले. तसेच, टॉक्सिक या चित्रपटातील अभिनेत्री वेस्ता मातुलितो आणि लेवा रुपीकाते यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. ‘होली काऊ’ चित्रपटासाठी क्लेमेंट फेवो याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला. या महोत्सवातील प्रतिष्ठेच्या सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्काराने ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध सिनेनिर्माते फिलीप नॉईस यांना सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
20 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या 9 दिवसीय इफ्फीचा काल दिमाखात समारोप करण्यात आला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ‘द न्यू इयर दॅट नेव्हर केम’ या चित्रपटासाठी रोमानियाच्या बोगदान मुरेसानू यांना मिळाला. युनेस्को गांधी पदक हे स्वीडिश चित्रपट निर्माते लेव्हन अकिन यांचा चित्रपट ‘क्रॉसिंग’साठी देण्यात आले. सर्वोत्कृष्ट पदार्पण फीचर फिल्म पुरस्कार ‘फेमिलिअर टच’साठी अमेरिकन दिग्दर्शक सारा फ्रेडलँड यांना देण्यात आला. ‘व्हू डू आय बिलाँग टू’ साठी अमेरिकन दिग्दर्शक सारा फ्रेडलँड यांना आणखी एक विशेष पुरस्कार देण्यात आला. ‘होली काऊ’ या चित्रपटासाठी लुईस कुरवोसर यांना स्पेशल ज्युरी पुरस्कार प्राप्त झाला. होली काऊ हा कॉमेडी चित्रपट आहे. विक्रांत मेस्सी याला वर्षातील भारतीय व्यक्तिमत्व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वेबसिरीज ओटीपी प्लॅटफार्मवरील उत्कृष्ट वेब सीरिज म्हमून ‘लंपन’ या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली. ही वेब सीरिज भारतीय ग्रामीण जीवनावर आधारित असून लहान मुलाच्या मानसिक व सामाजिक बदलाचे चित्रण त्यात करण्यात आले आहे.
गोव्यात चित्रपट निर्मितीसाठी
‘एक खिडकी’ योजना
विदेशी चित्रपट निर्मात्यांनी गोव्यात चित्रपट निर्मितीसाठी यावे. त्यांना राज्य सरकारकडून चित्रपट निर्मितीसाठी एक खिडकी योजनेतून मान्यता दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित इफ्फीच्या समारोप सोहळ्यात बोलताना काल केली. यावेळी गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष तथा आमदार डिलायला लोबो, आशुतोष गोवारीकर, शेखर कपूर व इतरांची उपस्थिती होती.
देशातील चित्रपट निर्मात्यांनी सुध्दा चित्रपटाच्या निर्मितीसाठी गोव्यात यावे. त्यांनाही एक खिडकी योजनेतून चित्रिकरणासाठी आवश्यक मान्यता दिली जाणार आहे. इफ्फीमुळे गोवा राज्य जागतिक नकाशावर पोहोचला आहे. या इफ्फीनिमित्त विदेशी पर्यटक सुध्दा मोठ्या संख्येने गोव्यात येतात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावर्षीच्या इफ्फीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक संगम साधण्यात आला. सिनेमा स्क्रिनिंगसाठी पणजीसह पर्वरी, फोंडा आणि मडगाव येथे व्यवस्था करण्यात आली होती. या चित्रपट महोत्सवात 190 पेक्षा जास्त चित्रपट दाखविण्यात आले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
चित्रपट निर्मात्यांनी चित्रिकरणासाठी नवीन तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे, असे ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध सिने निर्माते फिलीप नॉईस यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले. आपण चित्रपटाचा अभ्यास करण्यासाठी भारतात येत होतो. आपल्या चित्रपटासाठी योग्य कलाकार मिळत नसल्याने सत्यजीत रे यांचा सल्ला घेण्याची संधी मिळाली, असेही नॉईस यांनी सांगितले.
55 व्या इफ्फीमध्ये ऑस्ट्रेलिया ही ‘फोकस कंट्री’ होती. या चित्रपट महोत्सवात 7 ऑस्ट्रेलियन चित्रपट दाखविण्यात आले.
नवज्योत बांदिवडेकर यांना ‘घरात गणपती’साठी पुरस्कार जाहीर
55 व्या इफ्फीमध्ये नवज्योत बांदिवडेकर यांना त्यांच्या ‘घरात गणपती’ या मराठी चित्रपटासाठी भारतीय फीचर फिल्मचा सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा पुरस्कार मिळाला. नवज्योत बांदिवडेकर यांच्या दिग्दर्शनात कौशल्याची दखल घेण्यात आली.