मुख्यमंत्र्यांच्या नवी दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा नाही

0
2

>> भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची माहिती

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नवी दिल्ली दौऱ्यात राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर कुठल्याही प्रकारचे चर्चा झालेली नाही, अशी माहिती गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली.

मुख्यमंत्र्यांनी भाजपचे नेते, केंद्रीय मंत्र्यांशी भेट घेतली, त्यात राज्य मंत्रिमंडळातील फेररचनेचा विषय चर्चेला आला नाही, असेही तानावडे यांनी स्पष्ट केले. राज्यातील एसटी बांधवांना राजकीय आरक्षण देणारे विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात मांडले जाणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.

एसटी बांधवांना राजकीय आरक्षण देणारे विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती; परंतु पावसाळी अधिवेशनात एसटी राजकीय आरक्षण विधेयक मांडण्यात आले नव्हते. राज्यातील एसटी बांधव राजकीय आरक्षण विधेयकाची प्रतीक्षा करीत आहेत.

दरम्यान, गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी सुध्दा नवी दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. तवडकर यांनी केंद्रीय रस्ता व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे देखील आपल्या खात्याशी संबंधित काही प्रस्ताव केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडे सादर करण्यासाठी नवी दिल्लीत गेले आहेत.