जुन्या संसदेत संविधान दिन साजरा

0
3

देशाच्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवारी जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या विशेष कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू हे उपस्थित होते.

‘आपले संविधान-आपला स्वाभिमान’ ही कार्यक्रमाची संकल्पना होती. संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त एक नाणे आणि टपाल तिकीटही जारी करण्यात आले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारतीय राज्यघटना संमत करण्यात आली होती.
याशिवाय ‘मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन : अ ग्लिम्प्स’ आणि ‘मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि त्याचा गौरवशाली प्रवास’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

संस्कृत आणि मैथिली भाषेतील संविधानाच्या प्रतीही देण्यात आल्या. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचे ऐतिहासिक महत्त्व आणि प्रवास दर्शविणारा लघुपट दाखवण्यात आला.
75 वर्षांपूर्वी याच दिवशी संविधान सभेच्या त्याच सेंट्रल हॉलमध्ये संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार करण्याचे महान कार्य केले होते. संविधान हा आपल्या देशाचा सर्वात पवित्र ग्रंथ आहे. आज एका ऐतिहासिक दिवसाचे आपण साक्षीदार आहोत, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.