>> गोवा विद्यापीठात 75वा संविधान दिन साजरा
समान नागरी संहितेचे (यूसीसी) पालन करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. गोवा हे देशासाठी एक आदर्श राज्य असून, आम्ही सामाजिक सुधारणांमध्ये सर्वांत पुढे आहोत. आजच्या घडीला प्रत्येकजण त्यांच्या हक्कांसाठी लढत आहे. त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या संविधानाने सांगितलेली कर्तव्ये पाळावीत, तरच भारतीय राज्यघटनेला खरा न्याय मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केले. गोवा विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने 75 व्या संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ताळगाव येथे ते बोलत होते.
भारतात समान नागरी संहिता आणि एक देश एक निवडणूक लागू करण्याची गरज आहे.
भारताच्या राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे सर्व धर्मांसाठी समानतेचा, सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करतो. समान नागरी संहिता असलेले गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे. आता देशभरात समान नागरी संहिता आणि एक देश, एक निवडणूक संकल्पना का लागू करू नयेत, याचा विचार तरुणांनी केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
विकसित भारतासाठी प्रत्येक तरुणाने योगदान दिले पाहिजे. आपण मूलभूत कर्तव्ये पाळण्यात अपयशी ठरल्यास भारत देश पाकिस्तान आणि बांगलादेश यासारख्या देशांच्या मार्गावर जाऊ शकतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
यावेळी कायदा-पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, महाअधिवक्ता ॲड. देविदास पांगम, मणिपूर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश सिद्धार्थ मृदुल, राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, कायदा सचिव संदीप जॅकीस, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल बी. मेनन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.