>> 24 जणांना अटक; सायबर गुन्हा विभागाची कारवाई; अमेरिकन नागरिकांची 1 कोटींची फसवणूक
गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने झुआरीनगर येथे अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. या प्रकरणी 24 जणांना अटक केली असून, लॅपटॉप, मोबाईल फोन व इतर वस्तू जप्त केल्या. या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली, अशी माहिती पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी पोलीस मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल दिली.
गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाच्या पथकाने 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी ही कारवाई केली. या बनावट कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या अंदमान-निकोबार ते जम्मू-काश्मीरपर्यंत देशातील विविध राज्यांतील 24 जणांना अटक केली. संशयितांकडून 26 लॅपटॉप, 24 हेडफोन, 8 इंटरनेट राऊटर आणि 26 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. या कॉल सेंटरमध्ये कार्यरत असलेले संशयित आरोपी कर्जवितरण कंपनीचे एजंट, ॲमेझोनच्या मुख्यालयातील कर्मचारी, बँक कर्मचारी, ॲपल पे, सरकारी एजंट आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी असल्याची तोतयेगिरी करून अमेरिकेतील नागरिकांना मोठ्या रकमेचा भरणा करण्यास प्रवृत्त करीत होते. गिफ्ट कार्ड्स, बिटकॉइन्स आणि खोट्या सबबीखाली कर्ज साहाय्य, खरेदीची देयके आणि तांत्रिक समर्थनाचे आमिष दाखविले जात होते.
गोव्यात हे कॉल सेंटर एका महिन्यापासून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, या कॉल सेंटरच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. अटक केलेल्या 24 कर्मचाऱ्यांपैकी नवी दिल्लीतील 10, हरयाणातील 3, अंदमान-निकोबारमधील 1, उत्तरप्रदेशातील 4, पंजाबमधील 2, जम्मू-काश्मीरमधील 1, महाराष्ट्रातील 2 आणि गुजरातचा 1 आहे. त्यांची नियुक्ती एका ऑनलाइन एजन्सीद्वारे करण्यात आली होती आणि कॉल दरम्यान वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट स्क्रिप्ट्सवर त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांचा मासिक पगार 35,000 ते 40,000 रुपयांच्या दरम्यान होता, असे गुन्हा विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.
संशयित आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांचे आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शनची चौकशी केली जात आहे. पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.