>> सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांची मागणी; सहभाग आढळल्यास मंत्रिमंडळातून काढून टाका
सरकारी नोकरी घोटाळ्याच्या प्रश्नावरून सध्या राज्य सरकारसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झालेले असतानाच, काल महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या घोटाळ्याची स्वतंत्र यंत्रणेद्वारे चौकशी केली जावी, अशी मागणी करून सरकारच्या चिंतेत आणखी भर घातली. याशिवाय आमदार गणेश गावकर यांच्या आवाजातील जो कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे, त्या संभाषणात आपल्या आडनावाचा उल्लेख आहे. मी कोणाकडूनही नोकऱ्यांसाठी पैसे घेतलेले नाहीत. जर तसे आढळून आले, तर मला मंत्रिमंडळातून काढून टाका, असे खुले आव्हानही मोन्सेरात यांनी दिले.
बेधडक विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबूश मोन्सेरात यांनी काल नोकरी घोटाळ्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच विरोधकांनी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत या घोटाळ्याच्या चौकशीची जी मागणी केली होती, तशाच प्रकारची मागणी त्यांनी केली. सरकारमधीलच एका दिग्गज मंत्र्याने स्वतंत्र यंत्रणेमार्फत या घोटाळ्याचा तपास करावा, अशी मागणी केल्याने राज्य सरकारवरील दबाव वाढण्याची चिन्हे आहेत.
राज्य सरकार नोकऱ्या विकत नसून, सरकारला कळू न देता दलाल भानगडी करीत असल्याचे बाबूश मोन्सेरात यांनी काल स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेद्वारे चौकशी व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
आमदार गणेश गावकर यांच्या आवाजातील समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणात आपल्या आडनावाचा उल्लेख आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी गावकर यांना बोलावून त्यांना त्यासंबंधी विचारायला हवे, असे मोन्सेरात म्हणाले.
कुणाकडूनही 1 रुपयाही घेतलेला नाही : मोन्सेरात
आपण नोकऱ्यांसाठी कुणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत. त्यामुळे आपल्या आडनावाचा उल्लेख का करण्यात आला, त्यासंबंधी भाजप नेत्यांनी गावकर यांना विचारायला हवे. सदर ऑडिओ क्लिपमध्ये 7 लाख रुपयांचा उल्लेख आहे. आपण कुणाकडूनही एक रुपयाही घेतलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी चौकशी केली जावी. आपण नोकऱ्यांसाठी पैसे घेतल्याचे सिद्ध झाले, तर आपणाला मंत्रिमंडळातून काढून टाका, असे आव्हानही बाबूश मोन्सेरात यांनी दिले.
लाच देणाऱ्यांवरही कारवाई व्हावी : मोन्सेरात
सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे घेणाऱ्यांबरोबरच पैसे देणाऱ्यांवरही कारवाई केली जावी, अशी मागणी काल बाबूश मोन्सेरात यांनी केली. पैसे घेणारा जसा गुन्हेगार आहे, तसेच पैसे देणारेही गुन्हेगार आहे. त्यामुळे पैसे घेणाऱ्यांबरोबरच देणाऱ्यांचीही चौकशी व्हावी, असे ते म्हणाले.
राज्य सरकार चौकशी करणारच : रवी नाईक
सरकारी नोकरी घोटाळ्याची अगदी मुळाशी जाऊन चौकशी व्हायला हवी. आमचे सरकार चौकशी करणारच आहे, असे काल कृषिमंत्री रवी नाईक यांनी स्पष्ट केले. फोंडा येथे एका विकास प्रकल्पाचा शिलान्यास समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. या प्रकरणातील ‘गॉडफादर’ असो अथवा ‘गॉडमदर’ कुणाचीही या घोटाळ्यातून सुटका नसल्याचे नाईक म्हणाले.
उमा पाटीलविरुद्ध दोन दिवसांत तिसरा गुन्हा नोंद
>> नादोडा-बार्देशमधील महिलेची 4 लाखांची फसवणूक; उमाची 5 वाहने पोलिसांकडून जप्त
नादोडा-बार्देश येथील एका महिलेच्या पतीला सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून 4 लाख रुपये उकळल्या प्रकरणी उमा पाटील (रा. बायणा-वास्को) हिच्याविरुद्ध कोलवाळ पोलिसांनी आणखी एक गुन्हा नोंदवला. दोन दिवसांत तिच्याविरुद्ध तिसरा गुन्हा नोंद झाला आहे. तिचे आणखी कारनामे उघडकीस येण्याची शक्यता वास्कोतील नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.
याप्रकरणी उज्ज्वला सिद्धेश परब (रा. नादोडा, बार्देश) यांनी गुरुवारी (दि. 14 नोव्हेंबर) कोलवाळ पोलिसांत तक्रार दाखल केली. हा फसवणुकीचा प्रकार गेल्या ऑगस्टमध्ये घडला होता. संशयित आरोपी उमा पाटील हिने फिर्यादीच्या पतीला कोणत्याही सरकारी खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी तिने 4 लाख रुपये रोख रक्कम घेतली होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र अद्याप संशयित महिलेने आपले आश्वासन पूर्ण केले नाही. शिवाय फिर्यादींकडून घेतलेले पैसे परत केले नाहीत. वास्को पोलिसांनी उमाला अशाच फसवणुकीच्या प्रकरणात अटक केल्याची माहिती मिळताच उज्ज्वला परबने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
गुरुवारी उमा पाटीलविरुद्ध नौदलात नोकरीचे आमिष दाखवून फसवल्या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या आधी बुधवारी वास्को पोलिसांनी 6 लाखांच्या फसवणूक प्रकरणी उमा पाटील व तिचा मुलगा शिवम पाटील याला अटक केली होती.
2 बस, 2 कार व दुचाकी जप्त
मूळच्या सुनिता आमोणकर असलेल्या उमा पाटील पूर्वीपासून बायणातीलच रहिवासी आहेत. वास्को पोलिसांनी तिच्याविरुद्ध कारवाई करताना तिच्या दोन बसगाड्या, दोन कार व एक दुचाकी जप्त केली. पोलिस तिच्या अन्य मालमत्तांचाही शोध घेत आहेत.
नोकरी घोटाळ्यात आता दीक्षा
वास्को येथील सरकारी शाळेत शिपाई म्हणून सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने बायणा येथील एका महिलेची 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी दीक्षा तळवणेकर या महिलेविरुद्ध कलम 420 नुसार गुन्हा नोंदवला. यापूर्वी सदर महिलेविरुद्ध वास्को येथील गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.
विषया, सोनिया हिला 5 दिवस पोलीस कोठडी
कारवार येथील सी-बर्ड नौदल तळावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून 16 लाखांच्या फसवणूक प्रकरणी अटक केलेल्या विषया गावडे (रा. नेसाय) व सोनिया आचारी (रा. कारवार) या दोघा महिलांना काल मडगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.
या दोन महिलांनी नौदलात नोकरी देण्याचे आमिष दाखवून 2020 मध्ये नागमोडे-नावेली येथील सुनील बोरकर यांच्याकडून 16.12 लाख रुपये उकळले होते. गेली चार वर्षे पैसे नाही व नोकरी नाही अशी स्थिती झाली होती
21 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकास अटक
>> डिचोली पोलिसांची कारवाई; 5 दिवसांच्या कोठडीत रवानगी
सरकारी नोकरीच्या आमिषाने 21 लाख रुपये उकळल्या प्रकरणी डिचोली पोलिसांनी रावण, केरी-सत्तरी येथील माणिकराव राणे याला काल अटक केली. त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
डिचोलीचे उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल सावळ (मावळींगे-डिचोली) यांनी तक्रार दाखल केली होती. माणिकराव राणे याने तिला आणि तिच्या शेजाऱ्यांना – पूजा येंदे, दिनेश गावकर, अभिषेक धुरी, सत्यवान गावकर यांना विविध सरकारी विभागांमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देऊन 21,50,000 रुपये फसवणुकीने घेतले.
सदर तक्रार नोंद झाल्यानंतर माणिकराव राणे याला डिचोली पोलिसांनी अटक केली, त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक जिवबा दळवी, निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक विराज धाऊसकर हे अधिक तपास करत आहेत.