स्नेहल-कश्यप जोडीचा 606 धावांचा विक्रम
अरुणाचल प्रदेशविरुद्ध रणजी प्लेट विभागातील सामन्यात गोवा संघाकडून स्नेहल कवठणकर (नाबाद 314) व कश्यप बखले (नाबाद 300) या दोघांनी तिहेरी शतके लगावली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एकाच दिवशी एका डावात दोन तिहेरी शतकांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
यापूर्वी प्रथमश्रेणी क्रिकेटच्या एकाच डावात दोन तिहेरी शतकांची नोंद 1989 साली झाली होती. तामिळनाडूकडून खेळताना गोवा संघाविरुद्ध 21 जानेवारी 1989 रोजी वूर्केरी रमण यांनी, तर 22 जानेवारी 1989 रोजी अर्जन कृपाल सिंग यांनी आपले तिहेरी शतक पूर्ण केले होते.
स्नेहल व कश्यप यांनी तिसऱ्या विकेटसाठी 606 धावांची अविभक्त भागीदारी केली. भारतातील प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी हा विक्रम ठरला. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्वांत मोठ्या भागीदारीचा विक्रम माहेला जयवर्धने व कुमार संगकारा या श्रीलंकन जोडीच्या नावावर आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2006 साली 624 धावांची भागीदारी केली होती.