>> गुन्हा अन्वेषण विभागाकडून 5 जणांना अटक; आणखी काही जणांचा शोध सुरू
गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने एका बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत या प्रकरणी काल 5 जणांना अटक केली. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून बिंदी रामकृष्ण परब (34, रा. गवंडाळी कुंभारजुवा), भावेश बाळकृष्ण हळदणकर (33, रा. चोडण), निरज गोविंद गावडे (31, रा. पिळगाव), विष्णदास देमू भोमकर (42, रा. करमळी) आणि यशवंत रामा खोलकर (37, रा. तांबडीमाती ताळगाव) या पाच जणांना अटक करण्यात आली.
गवंडाळी कुंभारजुवा येथील बिंदी परब ही शैक्षणिक पात्रतेबाबत बनावट गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र तयार करीत असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाला 12 नोव्हेंबरला एका विश्वसनीय सूत्राकडून मिळाली. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी तातडीने तपासकाम सुरू करून बिंदी परब हिला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर बरीच माहिती समोर आली. या प्रकरणातील मुख्य संशयित बिंदी हिने 15 ते 20 बनावट प्रमाणपत्र तयार करून दिल्याची माहिती उजेडात आली आहे. संशयित आरोपी भावेश हळदणकर हा ग्रेस एज्युकेशनच्या वायलेट खंडेपालच्या वतीने एजंट म्हणून काम करीत होता. निरज गावडे याला आयजीएनओचे बनावट प्रमाणपत्र बिंदी परब हिने दिले आहे. विष्णुदास भोमकर याला एनआयओएसचे बनावट प्रमाणपत्र बिंदी परबने दिले आहे. यशवंत खोलकर याने फोंडा येथील राजेंद्र गावडे याच्याकडून बनावट प्रमाणपत्र घेतले आहे.
या प्रकरणातील आणखी संशयित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली. या प्रकरणी उपअधीक्षक राजेश कुमार, पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर, विकास देईकर, दत्ताराम राऊत तपास करीत आहेत.