शेतकऱ्याची हत्या
सोमवारीच मणिपूरच्या यानगांगपोकपी शांतीखोंगबान भागात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर अतिरेक्यांनी डोंगरावरून गोळीबार केला. त्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याशिवाय काही शेतकरी जखमी झाले.
मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या जवानांनी 11 दहशतवाद्यांना ठार केले. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवानही गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरेक्यांनी दुपारी अडीच वाजता बोरोबेकेरा येथील जाकुराडोर करोंग येथील पोलिस ठाण्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांची तेथे तैनात सीआरपीएफ जवानांशी चकमक झाली.
गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये सातत्याने हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू देखील झाल्याच्या घटना गेल्या वर्षभरात समोर आलेल्या आहेत. त्यानंतर आता सीआरपीएफने दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाई केली आहे.
मणिपूर हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी पोलीस स्थानकाजवळ एक मदत शिबिर आहे. या शिबिरात राहणारे लोक अतिरेक्यांच्या निशाण्यावर होते. याआधीही तेथे अनेकदा हल्ले झाले आहेत. त्यानंतर सीआरपीएफचे पथक तेथे तैनात करण्यात आले आहे.
कालच्या हल्ल्यावेळी अतिरेक्यांनी सैनिकांसारखाच गणवेश परिधान केला होता. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा होता. ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह बोरोबेकरा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यावर हल्ला केल्यानंतर काही अतिरेक्यांनी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जाकुराडोर करोंग येथील एका छोट्या वस्तीकडे धाव घेतली आणि घरांना आग लावण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी सुरक्षा दलांवरही गोळीबार केला.