>> पणजी येथील आझाद मैदानावर फार्मा कामगारांनी केली निदर्शने
राज्यातील विविध औषध निर्मिती कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सरकारने एस्मा कायदा लागू केला आहे. या कायद्याचा वापर करून कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडून कामगारांची सतावणूक केली जात असून मानव हक्क आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यप्रमुख जितेश कामत यांनी केली.
पणजी येथील आझाद मैदानावर कामगारांनी केलेल्या आंदोलनावेळी ते बोलत होते. यावेळी मंदार पार्सेकर, शंकर पंडित, विठ्ठल नाईक व फार्मा कंपनीचे अनेक कामगार उपस्थित होते.
यावेळी बोलताना जितेश कामत म्हणाले की, राज्यातील विविध औषध निर्मिती कंपन्यांमध्ये कामगार प्रामाणिकपणे काम करीत असतानाही त्यांना एस्मा लागू करून सरकारने आणि कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या हक्कांवर गदा आणली आहे. या कायद्याच्या मदतीने कामगारांची पिळवणूक सुरू आहे. याबाबत कामगारांनी आवाज उठवला तर कंपनी व्यवस्थापन कामगारांना कामावरून कमी करते किंवा गोव्याबाहेरील आस्थापनांत बदली करत असून हा कामगारांवर अन्याय असल्याचे कामत यांनी सांगितले.