दीपाश्रीकडून 44 जणांना 4 कोटींचा गंडा

0
3

‘मध्यस्थ’ तक्रारकर्त्याचा दावा; म्हार्दोळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल

दीपाश्री सावंत गावस (रा. तिवरे-माशेल) हिच्याविरुद्ध सरकारी नोकरीच्या आमिषाने 44 जणांकडून जवळपास 4 कोटी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याची तक्रार संदीप परब आणि ॲड. शैलेश गावस यांनी गुरुवारी म्हार्दोळ पोलीस स्थानकात दाखल केली. दीपाश्रीने पहिल्यांदा आपल्याकडून 3 लाख रुपये उकळले आणि नंतर आपल्यामार्फतच एकूण 44 जणांकडून जवळपास 4 कोटी रुपये लाटले, असा दावा संदीप परब याने केला. हे पैसे संदीप परबनेच मध्यस्थी करत दीपाश्रीपर्यंत पोहोचवले. नोकरी मिळाली नसल्याने ते लोक आता संदीपच्या मागे हात धुवून लागले आहेत. त्यामुळे त्यानेच दीपाश्रीविरुद्ध काल म्हार्दोळ पोलिसांत तक्रार नोंदवली.

तक्रार नोंदवल्यानंतर ॲड. शैलेश गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरनियोजन आणि वन खात्यात नोकरी देण्याची बतावणी करत दीपाश्री सावंत हिने आपण सरकारी खात्याची कर्मचारी असल्याचे भासवत दुकानदार असलेल्या संदीप परब यांची फसवणूक केली. नोव्हेंबर 2023 साली दुकानात खरेदीसाठी आलेल्या दीपाश्रीने संदीप परब यांच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर राजकीय व्यक्तींबरोबर काढलेली छायाचित्रे दाखवून संदीप परब यांच्या मुलीला नगरनियोजन खात्यात नोकरी देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी 8 लाख रुपये देण्याचे निश्चित झाले. संदीप परब यांनी पहिल्यांदा दीपाश्रीला 3 लाख रुपाये आगाऊ दिले. त्यानंतर इतरांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवण्यासाठी संदीप परब यांचा वापर केला. दीपाश्रीने संदीप परब यांना मध्यस्थ बनवत 44 जणांकडून सरकारी नोकऱ्यांच्या बहाण्याने जवळपास 4 कोटी रुपये उकळले; पण नोकरी मिळवून दिलीच नाही.

राजकीय नेत्यांसोबतची छायाचित्रे आणि सरकारी कागदपत्रे वापरून लोकांची फसवणूक केली असल्याचे ॲड. शैलेश गावस यांनी निदर्शनास आणून दिले. दीपाश्रीला राजकीय आश्रय असल्याने सदर प्रकार घडला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिसांनी सत्य उघडकीस आणण्याची गरज आहे. पोलिसांनी दबावाला बळी न पडता दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दीपाश्रीला आणखी 5 दिवस कोठडी
सरकारी नोकरी देण्याच्या बदल्यात रक्कम घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी अटक केलेल्या दीपाश्री सावंत हिला आणखी 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला. मंगळवारी न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलीस कोठाडीत ठेवण्याचा दिलेला आदेश गुरुवारी संपुष्टात आल्याने तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. फोंडा पोलिसांनी यापूर्वी दीपाश्रीच्या 3 आलिशान कार व 2 दुचाकी जप्त केल्या होत्या.

ठकसेन प्रिया यादवकडून
78 लाखांची फसवणूक

डिचोली पोलिसात आणखी एक गुन्हा नोंद

रेल्वे व अन्य खात्यात नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणात डिचोली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रिया यादवविरुद्ध डिचोली पोलिसांनी रोख रकमेच्या फसवणूक प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. जमीन खरेदी आणि रेल्वे स्थानकांवर स्टॉल्स खरेदीच्या बहाण्याने प्रियाने तक्रारदार महिलेसह तिच्या तीन बहिणींकडून जवळपास 78 लाख रुपये उकळले. याशिवाय सोन्याचे दागिनेही लुबाडले.

डिचोलीचे पोलीस उपाधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंती रघुनाथ वायगंणकर (बोर्डे डिचोली) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सन 2017 ते जून 2024 दरम्यान डिचोली येथे वास्तव्यास असलेल्या प्रिया यादवने तक्रारदाराची अंदाजे 35,00,000 रुपयांची फसवणूक केली. वेगवेगळ्या प्रसंगी जमिनीच्या मालमत्तेची खरेदी, रेल्वे स्थानकांवर स्टॉल्स खरेदी आणि इतर विविध कारणे सांगून हे पैसे उकळले. याशिवाय सोन्याच्या 2 बांगड्या, 3 अंगठ्या आणि 1 ब्रेसलेटही विविध कारणांनी घेतले. मात्र जमीन किंवा रेल्वे स्टॉल्स मिळवून देण्यात ती अपयशी ठरली आणि पैसेही परत केले नाहीत. त्यानंतर जयंती वायंगणकर यांनी तक्रार दाखल केली.

याशिवाय तक्रारदार महिलेच्या इतर 3 बहिणींना प्रिया यादवने लाखो रुपयांचा गंडा घातला. ललिता यांच्या 36,00,000 रुपये आणि 116.630 ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे बिस्किट उकळले. मिलन यांच्याकडून 4,50,000 रुपये आणि पूर्णा यांच्याकडून 3,73,000 लाख रुपये लाटले. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी आयपीसी कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.