‘त्या’ दोन महिला पोलिसांकडून आत्महत्येचा प्रयत्न

0
5

प्रथमेश गावडे आत्महत्या प्रकरण; कोलवाळ कारागृहात घडली घटना; पाण्याच्या टाकीवरून मारल्या उड्या

पोलीस शिपाई प्रथमेश गावडे याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणात अटक आणि नंतर निलंबित केलेल्या महिला पोलीस प्रीती चव्हाण आणि तनिष्का चव्हाण यांनी काल आत्महत्येचा प्रयत्न केला. कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांसाठी असलेल्या कक्षाच्या पहिल्या मजल्यावरील छतावरील पाण्याच्या टाकीवरून खाली उडी घेत त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या दोघीही जखमी झाल्या.

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने पोलीस शिपाई प्रथमेश गावडे याच्या आत्महत्या प्रकरणामध्ये संशयित प्रीती चव्हाण आणि तनिष्का चव्हाण यांना 4 नोव्हेंबरला अटक केली होती. प्रथमेशने 25 ऑक्टोबरला झुआरी पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या केली होती. प्रथमेशने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये त्या दोघांची नावे घेत त्यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केला होता.

काल कारागृहातील महिला कक्षामधून दोघींना बाहेर काढले होते. या कक्षाच्या फाटकावरून दोघी जणी छतावरील पाण्याच्या टाकीवर चढल्या व तिथून त्यांनी हातात हात घेऊन खाली उडी घेतली. त्यांना तातडीने कारागृहातील दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर दोघांना उपचारार्थ उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. दोघींच्या हात आणि पायाला किरकोळ दुखापत झाली आहे, अशी माहिती इस्पितळातील सूत्रांनी दिली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

प्रथमेश गावडे याच्या आत्महत्या प्रकरणामध्ये आम्हाला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणात आमचा सहभाग नाही. आम्ही निर्दोष आहोत, असा दावा संशयितांनी जिल्हा इस्पितळात उपचारावेळी पत्रकारांशी बोलताना केला.

उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी प्रीती चव्हाण आणि तनिष्का चव्हाण यांच्या निलंबनाचा आदेश काल जारी केला. त्याच दिवशी सकाळी अकराच्या सुमारास कारागृहात दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
अटकेनंतर येथील न्यायालयाने त्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्या दोघींनी जामिनासाठी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून, शुक्रवारी निवाडा जाहीर केला जाणार आहे.