इको सेन्सिटिव्ह झोनमधून 21 गावे वगळा

0
2

>> राज्य सरकारची केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला विनंती; 7 सदस्यीय समितीने केली होती शिफारस

राज्य सरकारने पश्चिम घाटातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून (इको सेन्सिटिव्ह झोन) 21 गावे वगळण्याची विनंती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे केली आहे. त्यात सत्तरी तालुक्यातील सर्वाधिक 12 गावांचा समावेश आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेल्या पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र मसुद्यात राज्यातील 108 गावांचा आणि एकूण 1,247 चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश होत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या मसुद्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने भारतीय वन सर्वेक्षणाचे माजी महासंचालक डॉ. देवेंद्र पांडे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समितीची स्थापना केली होती. या समितीने पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात येणाऱ्या गावांचा आढावा घेऊन 21 गावे वगळण्याची शिफारस केली आहे.

या समितीने केलेल्या शिफारशीनंतर राज्य सरकारने केंद्रीय मंत्रालयाकडे 21 गावे वगळण्याची विनंती केली आहे. त्यात सत्तरीतील भिरोंडा, भुईपाल, खोडये, अन्सुली, खडकी, खोतोडे, कुंभारखण, पणशे, केरी, सातोडे, शिरोली, वेळुस या बारा गावांचा समावेश आहे. धारबांदोडा तालुक्यातील कामरखण, म्हैसाळ, धारबांदोडा, सांगोड आणि पिळ्ये या पाच गावांचा समावेश आहे. तसेच, सांगे तालुक्यातील कोळंब, रिवण, रूम्रे आणि काणकोण तालुक्यातील खोला या गावांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आपल्या दिल्ली भेटीत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडे या विषयावर चर्चा केली होती. राज्य सरकारने पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये गोव्यातील 87 गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मंत्रालयाने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता केल्यामुळे 87 गावे संवेदनशील क्षेत्रात कायम ठेवण्याची सूचना राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने केली आहे. त्यात सत्तरी तालुक्यातील 51 गावे, सांगे तालुक्यातील 23 गावे, धारबांदोडा तालुक्यातील 8 गावे, काणकोण तालुक्यातील 4 आणि फोंडा तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे.
दरम्यान, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञांचे पथक राज्य सरकारच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यासाठी याच महिन्यात गोव्यात येण्याची शक्यता आहे.

कोणत्या तालुक्यातील किती गावांचा समावेश?
सत्तरी तालुका : 51 गावे
सांगे तालुका : 23 गावे
धारबांदोडा तालुका : 8 गावे
काणकोण तालुका : 4 गावे
फोंडा तालुका : 1 गावे

कोणत्या तालुक्यातील किती गावे वगळणार?
सत्तरी तालुका : 12 गावे
धारबांदोडा तालुका : 5 गावे
सांगे तालुका : 3 गावे
काणकोण तालुका : 1 गावे