उत्तर गोवा कोमुनिदादचा माजी प्रशासक निलंबित

0
2

>> कामुर्ली कोमुनिदाद जमिनीच्या नियमबाह्य म्युटेशनसाठी दिली होती एनओसी

कामुर्ली कोमुनिदादच्या सुमारे 4.10 लाख चौरस मीटर नियमबाह्य जमीन म्युटेशन प्रकरणामध्ये उत्तर गोवा कोमुनिदादच्या म्हापसा विभागाचे माजी प्रशासक दीपक वायंगणकर यांना राज्य सरकारच्या दक्षता खात्याने काल निलंबित केले. दीपक वायंगणकर हे सध्या वाळपईचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
दक्षता खात्याच्या संचालक यशस्विनी बी. यांनी या संबंधीचा आदेश काल जारी केला आहे. या प्रकरणामध्ये माजी प्रशासक दीपक वायंगणकर यांची चौकशी केली जाणार असून, निलंबनाच्या काळात त्यांना कार्मिक खात्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर गोवा कोमुनिदादच्या म्हापसा विभागाचे प्रशासक म्हणून कार्यरत असताना दीपक वायंगणकर यांनी कामुर्ली कोमुनिदादच्या सुमारे 4.10 लाख चौरस मीटर जमिनीच्या म्युटेशनसाठी अब्दुल रेहमान लतिफ शेख याला ना हरकत दाखला (एनओसी) दिला होता. कोमुनिदादची जमीन कोमुनिदादचा ‘गावकार’ असलेल्या व्यक्तीला दिली जाऊ शकते; पण शेख हा कोमुनिदादचा गावकार नसल्याने कामुर्ली कोमुनिदादच्या गावकारांनी याबाबत सरकारी यंत्रणेकडे तक्रार करून चौकशी व कारवाईची मागणी केली होती.

कोमुनिदादच्या गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर सरकारी यंत्रणेला जाग आली आणि चौकशीला सुरुवात करण्यात आली. यानंतर उत्तर गोवा कोमुनिदादच्या म्हापसा विभागाचे विद्यमान प्रशासक पांडुरंग गाड यांनी शेख याला दिलेला ना हरकत दाखल मागे घेणारा आदेश सोमवारी जारी केला.
कामुर्ली कोमुनिदादच्या सदर जमिनीचे प्रकरण वर्ष 2022 पासून प्रलंबित होते. उत्तर गोवा कोमुनिदादच्या म्हापसा विभागाच्या प्रशासकपदी नियुक्ती झाल्यानंतर दीपक वायंगकर यांनी आपल्या अल्प कार्यकाळात कोमुनिदादची 4.10 लाख चौरस मीटर जमीन अब्दुल शेखच्या नावावर करण्यासाठी ना हरकत दाखला दिला होता.