‘दूधसागर टूर ऑपरेटर्स’चे साखळी उपोषण तूर्त मागे

0
2

>> धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांनी केली गर्दी

कुळे येथील दूधसागर टूर ऑपरेटर संघटनेच्या मागण्या काही प्रमाणात सोडविण्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना यश आले आहे. त्यानंतर जीप मालकांनी साखळी उपोषण तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारी सकाळपासून कुळे बाजारात हजारो पर्यटकांनी गर्दी करून बाजाराला वेगळे स्वरूप प्राप्त करून दिले. दूधसागर जीप ऑपरेटर्स संघटना व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यात झालेल्या बैठकीत वाढवलेले शुल्क 200 रुपयांनी कमी करून ‘जीटीडीसी’च्या काऊंटरसह ऑनलाईन बुकिंगही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दूधसागर टूर ऑपरेटर संघटनेतर्फे गेल्या काही दिवसांपासून गोवा पर्यटन विकास मंडळाने सुरू केलेला काउंटर बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. शनिवारी सकाळी कुळे बाजारात तणाव निर्माण झाल्यानंतर माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी मध्यस्थी करून सध्याकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची खास बैठक घेऊन तोडगा काढला. त्यामुळे काल रविवारपासून कुळे बाजारात पर्यटकांची गर्दी दिसून आली. अंदाजे 1 हजारपेक्षा अधिक पर्यटक सकाळीच कुळे बाजारात दाखल झाले. संघटनेचे अध्यक्ष नीलेश वेळीप यांनी बैठक घेऊन जीप मालकांना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी झालेल्या बैठकीची माहिती करून दिल्यानंतर जीप गाड्या सोडण्यात आल्या.

गेल्या काही दिवसापासून जीप मालकांचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी मंत्री दीपक पाऊसकर, सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई, रमाकांत गावकर, मच्छिंद्र देसाई, ॲड. आतिष गावकर व अन्य भाजप कार्यकर्ते वारंवार बैठक घेत होते. शनिवारी संध्याकाळी भाजपच्या नेत्यांना प्रश्न सोडविण्यात यश आले.

जीप व्यवसाय पुन्हा झाल्याने संघटनेचे अध्यक्ष नीलेश वेळीप यांनी दूधसागर टूर ऑपरेटर संघटनेला अनेक लोकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. मागण्या मान्य करून घेण्यासाठी जीप मालकांनी सहकार्य केले. भविष्यात जीप मालकांमध्ये फूट घालण्याचा प्रयत्न घालणाऱ्या व्यक्तींनी पुन्हा फूट घालण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन वेळीप यांनी केले आहे.