अतिसंवेदनशील गावांची केंद्रीय पथक करणार पाहणी ः सिक्वेरा

0
1

पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून अधिसूचित झालेल्या गावांतील काही गावे या यादीतून वगळण्यात यावीत अशी राज्य सरकारने जी मागणी केलेली आहे त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे एक पथक या महिन्यात राज्याला भेट देणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी काल दिली.

दिल्ली भेटीत आम्ही केंद्राकडे वरील मागणी केली होती. त्यावेळी आम्ही केंद्राला त्या क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे पथक गोव्यात पाठवा म्हणजे ते स्वतः पाहणी करून योग्य काय तो निर्णय घेतील असे केंद्राला सांगितले होते. या पार्श्वभूमीवर चालू महिन्यात हे पथक गोव्यात येणार असल्याचे सिक्वेरा यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गोव्याच्या पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून अधिसूचित केलेली ही गावे सत्तरी, सांगे व काणकोण तालक्यातील आहेत. यापूर्वीही एकदा हे पथक गोव्यात येऊन गेले आहे. त्यावेळी या पथकातील अधिकाऱ्यांनी काणकोण व सत्तरीतील लोकांची भेट घेऊन त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतली होती. त्यावेळी हे पथक मुख्यमंत्र्यांनाही भेटले होते.