फटाक्यांचा आयईडी बॉम्बसदृश्य स्फोट

0
2

>> आंधप्रदेशातील घटनेत 1 इसम ठार; 6 जण जखमी

आंध्र प्रदेशातील एलुरुमध्ये दुचाकीवरून फटाक्यांचा बॉक्स घेऊन जात असतानाच बॉक्स रस्त्यावर पडून आयईडी बॉम्बसदृश्य स्फोट झाला. या स्फोटात एकाचा दुर्दैवी अंत झाला, तर 6 जण जखमी झाले. स्फोटावेळी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या 3 जणांसह एकूण 6 जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दिवाळीच्या दिवशी घडली आणि त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ गुरुवारी रात्री उशिरा समोर आला.

सविस्तर माहितीनुसार, एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन लोक एका अरुंद रस्त्यावरून वेगाने जात होते. वेळ दुपारची होती. दुचाकीस्वाराच्या हातात ‘कांदा बॉम्ब’चा बॉक्स होता. गल्लीचा रस्ता आणखी रुंद होऊन मुख्य रस्त्याला जोडतो, तिथे दुचाकी पोहोचल्यावर अचानक खड्ड्यात गेली आणि त्यानंतर फटाक्यांचा बॉक्स खाली कोसळून मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज आयईडी बॉम्बसारखा मोठा होता. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले. त्यावेळी काहीजण कसेतरी स्फोटातून बचावले आणि सुरक्षित स्थळी धावले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीचे काही तुकडे दूरवर विखुरलेले दिसत आहेत.
या घटनेत जखमी झालेल्या सहा जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.