महाराष्ट्राची लढत

0
13

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नामांकने दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवारी उलटून गेल्यानंतर आता तेथील एकंदर राजकीय चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात जशी ह्या निवडणुकीमध्ये सरळ लढत होणार आहे, त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एआयएमआयएम, मनोज जरांगे पाटलांचा मराठा क्रांती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी आदी त्रयस्थ शक्तीही रिंगणात उतरलेल्या असल्याने यावेळी निवडणुकांचे निकाल काय लागतात त्याबाबतचे औत्सुक्य वाढले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्याचे वारे विरते न विरते तोच, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा फुटला आणि अजित पवार बंडाचा झेंडा घेऊन पुढे निघाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या दोन्हींमधील फुटीच्या बळावर भारतीय जनता पक्षाने धूर्तपणे पडद्याआडून महाराष्ट्रात सत्ता काबीज केली खरी, परंतु ही आडमार्गाने काबीज केलेली सत्ता टिकणार की जाणार हे ही येणारी निवडणूक सांगणार आहे. बदललेली सरकारे, बदललेल्या निष्ठा, बदललेली पक्षांची नावे आणि चिन्हे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे सुज्ञ मतदार काय कौल देणार ह्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. निवडणूक नामांकनांचा विचार करता ह्यावेळी भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 148 जागांवर आपले उमेदवार उतरवून आघाडी घेतली आहे. 288 मतदारसंघ असलेल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये मुख्यमंत्रिपद आपल्याकडे आणण्याचा भाजपचा यामागील इरादा स्पष्ट दिसतो. काहीही करून आपण येत्या निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष बनण्याचा निर्धार भाजपने केलेला आहे. गेल्यावेळी सत्ता काबीज करण्यासाठी जरी एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांना भाजपने सोबतीला घेतले असले, तरी हे लोढणे कायमचे गळ्यात अडकवण्याऐवजी आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखालील सत्ता यावी हे भाजपचे स्वप्न आहे आणि त्याच दिशेने त्याची चतुर पावले पडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला काँग्रेस पक्ष राज्यातील एकेका पक्षामध्ये उभी फूट पडत असताना आपला कळप अभेद्य राखण्यात यशस्वी ठरला, परंतु आता येणारी निवडणूक ही पक्षासाठी कसोटीची वेळ आहे. भाजप खालोखाल काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 103 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्हीही गट आपापल्या अस्तित्वाची लढाई ह्या निवडणुकीत लढत आहेत हे तर स्पष्टच आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांना आपले केवळ आमदार खासदारच नव्हे, तर आपले पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गमवावे लागले असल्याने काहीही करून येत्या निवडणुकीत आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी शर्थ करावी लागणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई ह्या निवडणुकीत कामी येईल असा विश्वास त्यांना आहे, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर थेट बाळासाहेबांच्या वारशावरच दावा केलेला असल्याने मतदार ह्या निवडणुकीत कोणाची साथ देतात हे पाहावे लागेल. जी गोष्ट शिवसेनेची, तीच राष्ट्रवादी काँग्रेसची. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली, परंतु विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती घडविण्याची कामगिरी पवारांना करून दाखवावी लागणार आहे. उद्धव यांनी 89 उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत, तर शरद पवारांनी 87. दुसरीकडे बंडखोरी करून मुख्यमंत्रिपद पटकावूनही एकनाथ शिंदे यांना 80 उमेदवार उभे करता आले, तर अजित पवारांनी 53 जणांना उमेदवारी दिली आहे. महायुतीतील जागावाटप पाहता भारतीय जनता पक्ष ह्यावेळी आपला वरचष्मा राखू इच्छितो हे स्पष्ट दिसते. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक निवडणुकीत वेगळी भूमिका घेत आली आणि मतदारांना गोंधळात पाडत आली. राज ठाकरे यांचे राजकीय निर्णय दरवेळी चुकतच गेले. त्यामुळे ह्यावेळी त्यांनी मनसे स्वबळावर निवडणूक लढवील असे जाहीर केले आणि आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे केले आहेत. मराठा क्रांती मोर्चा नावाचे नवे आव्हानही ह्या निवडणुकीत उभे आहे. एकूणच निवडणुकीचा आखाडा लढती रंगतदार ठरण्याची चाहुल देतो आहे. निष्ठावंत विरुद्ध गद्दार हा मुद्दा ह्या निवडणुकीत कायम राहणार का की सत्ता त्यावर मात करणार हे पाहावे लागेल. सत्तेचे सुकाणू स्वतःच्या हाती ठेवण्याचा भाजपचा मनसुबा यावेळी तडीस जाणार का, तसे झाल्यास एकनाथ शिंदे, अजितदादांचे काय होणार ह्याबाबत उत्सुकता आहे.