गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने 24 आणि त्याहून अधिक सदनिका असलेली निवासी संकुले, बेकरी युनिट्स, लाँड्री, फ्लोअर आणि राईस मिल्स, सुतारकाम युनिट्स इत्यादींना जल आणि वायू प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत परवानगी बंधनकारक केले असून, जल आणि वायू प्रदूषण नियंत्रण कायद्यांर्तंगत परवाने न घेणारी आस्थापने बंद करण्याचा इशारा दिला आहे.
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासंबंधीची सार्वजनिक सूचना जाहीर केली. त्यात मोठी निवासी संकुले, बेकरी, पिठाची गिरण, सुतारकाम, हॉटेल्स, गेस्ट हाउस रिसॉर्ट, मोटेल्स, रेस्टॉरंट्स, वॉशिंग सेंटर्स, बँक्वेट हॉल, ओपन एअर हॉल, पार्टी स्थळे, मॅरेज हॉल, सॉ मिल्स, 15 आणि त्याहून अधिक जनावरांची डेअरी, गोशाळा, 5000 आणि त्याहून अधिक पक्ष्यांचा कुक्कुटपालन व्यवसाय, 15 नगांसह डुक्कर फार्म, चिरे खाणी यांना जल आणि वायू प्रदूषण कायद्याखाली परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. प्रदूषण मंडळाच्या वैध संमतीशिवाय कार्यरत असलेल्या आस्थापनांचे कामकाज बंद करण्यात येणार आहेत, असा इशारा देण्यात आला आहे. मंडळाकडून जल आणि वायू प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत ज्या आस्थापनांनी मान्यता घेतली असेल, त्यांनी परवानगीबाबत सविस्तर माहिती आस्थापनांच्या आवारात लावावी, अशी सूचना करण्यात आली आहे. राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या ध्वनी कृती आराखड्यानुसार ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या तक्रारी स्थानिक पोलिसांकडे कराव्यात, असेही मंडळाने म्हटले आहे.