भारत-चीन सीमेवर सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्णत्वास

0
3

भारत आणि चीन यांच्यात 2020 पासून सुरू असलेला सीमावाद आता संपुष्टात येणार आहे. दोन्ही देशांनी वादग्रस्त भागातून सैन्य माघारी घेण्याचे, तसेच या भागातील अस्थायी चौक्या हटवण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार सीमेवरील सैन्य मान्य मागे घेण्याची आणि चौक्या हटवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे देप्सांग पठार आणि देम्चोक या दोन ठिकाणी आता भारतीय सैनिकांना मे 2020 पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे. गस्तीबाबत लवकरच ग्राऊंड कमांडरच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. ग्राउंड कमांडर्समध्ये ब्रिगेडियर आणि त्याहून कमी दर्जाचे अधिकारी असतात. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही देशातील सैन्य अधिकारी गुरुवारी एकमेकांना मिठाई देत दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहेत.

यासंदर्भात लष्करातील सूत्रांनी सांगितले की, दोन्ही देशांनी या भागातील सैन्यही मागे बोलवले आहे. तसेच या भागातील अस्थायी चौक्या हटवण्याची प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. आता दोन्ही देशांचे अधिकारी या भागांची पाहणी करत आहेत. या पाहणीदरम्यान ड्रोन्सची मदतही घेतली जात आहे.

ही पाहणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय सैनिकांना पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे. मात्र, भारतीय सैनिकांना याची पूर्वकल्पना चीनच्या सैनिकांना देणे बंधकारक आहे. गस्त घालताना दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये कोणताही तणाव निर्माण होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. महत्त्वाचे म्हणजे अशाच प्रकारची व्यवस्था आता अरुणाचल प्रदेश सीमेवरील वादग्रस्त भागांमध्ये लागू करण्याचा प्रयत्न असल्याचे लष्काराच्या सूत्रांनी सांगितले.

खरे तर मे 2020 पासून भारत आणि चीन सैन्यामध्ये सीमेवर तणाव आहे. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी 20 भारतीय जवान शहीद झाले होते, तर काही चिनी सैनिकही मारले गेले होते. गेल्या काही दशकांतील हा सर्वांत भीषण संघर्ष होता. जोपर्यंत चीनबरोबरचे संबंध सामान्य होत नाही तोपर्यंत सीमेवर शांतता प्रस्थापित होणे अशक्य असल्याचे मत भारताने मांडले होते. त्यासाठी भारताने देप्सांग आणि देम्चोक भागातून चीनी सैन्याला हटविण्यासाठी दबाव वाढविला होता. चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्यानंतर काही दिवसांपूर्वी या भागातून सैन्य मागे घेण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.