ज्येष्ठ लेखिका वीणा देव यांचे निधन

0
2

लेखन, संकलन, संपादन असे साहित्य प्रकार लीलया हाताळून अभिवाचनाच्या माध्यमातून अभिजात साहित्याच्या प्रचारामध्ये योगदान देणाऱ्या ज्येष्ठ लेखिका आणि मराठीच्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका डॉ. वीणा देव (76) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्या ज्येष्ठ लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत. त्यांच्या पश्चात प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि मधुरा यांच्यासह जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

गोनीदा यांच्यामुळे वीणा देव यांच्यावर घरातच मराठी भाषा आणि साहित्याचे संस्कार झाले. शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी 32 वर्षे अध्यापन कार्य केले. विभागप्रमुख म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. ‘मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएच. डी. संपादन केली होती.
पती डॉ. विजय देव, मृणाल आणि मधुरा या कन्या आणि जावई रुचिर कुलकर्णी यांच्यासमवेत वीणा देव यांनी गो. नी. दांडेकर यांच्या कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे साडेसहाशेहून अधिक प्रयोग केले. गोनीदा यांच्या स्मरण जागरणासाठी त्यांनी मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन असे उपक्रम राबविले होते. मृण्मयी प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी गोनीदा यांच्या दुर्मीळ साहित्यकृती प्रकाशित केल्या होत्या.

‘कधीकधी’, ‘परतोनी पाहे’, ‘स्त्रीरंग’, ‘विभ्रम’, ‘स्वान्सीचे दिवस’ हे त्यांचे लेखनसाहित्य प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे ‘स्मरणे गोनिदांची’ हा स्मरणग्रंथ, तसेच यशवंत देव आणि डॉ. ह. वि. सरदेसाई यांची वीणा देव यांनी संपादित केलेली दोन पुस्तके आहेत. तसेच त्यांनी गो. नी. दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर’ या व्यक्तिचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता.