नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; दोन प्रकरणांत पोलिसासह दोघे अटकेत

0
3

सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणाऱ्यांची संख्या राज्यात बरीच असल्याचे आता उघड होऊ लागलेले आहे. अशाच प्रकारे कित्येक जणांकडून सुमारे 40 लाख रु. घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या कुर्टी-फोंडा येथील डॉ. प्रकाश राणे याला पोलिसांनी सिंधुदुर्ग येथून ताब्यात घेतले आहे. तसेच शिक्षिकेची नोकरी मिळवून देतो असे एका महिलेला आमिष दाखवून तिची 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस शिपाई सुदेश नाईक याला अटक करण्यात आली आहे. एकाच दिवशी दोन फसवणुकीच्या गुन्ह्यांत दोघांना अटक करण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे.

पूजा नाईक नामक एका सरकारी कर्मचारी महिलेला यापूर्वीच वरील प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. व्यवसायाने गुरांचा डॉक्टर असलेल्या प्रकाश राणे याने सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून कित्येक जणांकडून लाखो रु. घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलीस त्याच्या शोधात होते. शेवटी पोलिसांनी त्यांना सिंधुदुर्ग येथून ताब्यात घेतले. डॉ. राणे याच्यावर जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या दरम्यान सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून कित्येक जणांकडून मिळून 40 लाख रु. घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे.

पोलीस शिपायाला अटक
उसगाव येथील तृप्ती प्रभू या विवाहित महिलेला माशेल भागातील एका माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षिकेची नोकरी देण्यासाठी संशयिताने 15 लाख रुपये घेतले होते. परंतु अजूनपर्यंत नोकरी दिली नसल्याने काही दिवसांपूर्वी संशयित सुदेश नाईकविरुद्ध फोंडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद केला होता. रविवारी सकाळी फोंडा पोलिसांनी संशयिताला अटक केली. अटक केलेला संशयित सुदेश नाईक हा पोलीस खात्याचा कर्मचारी असून त्याने आणखी कित्येक जणांची फसवणूक केली असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला आहे.

दरम्यान, सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणात आतापर्यंत आणखी किमान सात-आठ जणांविरुद्ध तक्रारी नोंदवण्यात आलेल्या असून त्यात पेडण्यापासून काणकोणपर्यंतच्या भामट्यांचा समावेश आहे. अजूनही आणखी काही जणांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कोट्यवधींचा गंडा

काही दिवसांपूर्वी, नोकरी देण्याचे आमिष आणि अन्य कारणांवरुन एका महिलेने डिचोलीतील अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. हा गंडा पोलीस कर्मचाऱ्याने एका महिलेच्या साथीने घातल्याचे उघड झाले होते. संशयित महिलेच्या आमिषाला बळी पडलेल्या पीडितांनी डिचोली पोलिसांत तक्रार करताच पोलिसांनी फरार महिलेसह तिचा साथीदार पोलीस हवालदाराविरोधात गुन्हा नोंद केला. संशयित महिलेने डिचोलीतील काही महिलांना पाच कोटींपेक्षा अधिक रुपयांना गंडा घातल्याचे तक्रारीत उघड झाले होते. ही महिला डिचोलीत एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये राहात होती आणि पोलीस असल्याचे सांगितल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला होता.