चक्रीवादळामुळे ओडिशातील 1.75 लाख एकरमधील पिकाची हानी

0
2

भारतीय हवामान विभागाने ‘दाना’ चक्रीवादळाचा ओडिशासह अनेक राज्यांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली होती. या चक्रीवादळामुळे आणि त्या सोबत आलेल्या पावसामुळे ओडिशा राज्यातील सुमारे 1.75 लाख एकर शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर राज्यातील 2.80 लाख एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. नुकसानीचे प्राथमिक मूल्यांकन केल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली होती. त्यात कृषी क्षेत्रातील नुकसानीचे अंतिम मूल्यांकन सविस्तर अहवालाच्या आधारे कळेल, ज्याच्या आधारे सरकार शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेईल. राज्यातील सुमारे 8 लाख लोकांना सुरक्षित आश्रयस्थानी हलवण्यात आले आहे, त्यापैकी अनेकांना हवामान सुधारल्यानंतर घरी परतण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती दिली होती.
ओडिशा सरकारने कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पीक नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत.

वीजपुरवठा खंडित
दाना चक्रीवादळामुळे राज्यातील 22.42 लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. यापैकी 14.8 लाख घरांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आणि उर्वरित घरांचा वीजपुरवठा हळूहळू पूर्ववत केला जाईल अशी माहिती देण्यात आली.

वेगवान वारे
चक्रीवादळ शुक्रवारी 25 रोजी सकाळी पूर्व किनारपट्टीवरून ओडिशात दाखल झाले. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहू लागले. त्यामुळे झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले. त्याचवेळी ओडिशात काही
ठिकाणी ताशी 110 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. ओडिशा तसेच पश्चिम बंगालमध्ये दानामुळे पायाभूत सुविधा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.