आठ फुटिर आमदारांना सभापतींकडून लेखी युक्तिवादासाठी सोमवारपर्यंत मुदत

0
4

गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवरील अंतिम युक्तिवाद काल ऐकून घेतला असून सर्व पक्षकारांना सोमवार 28 ऑक्टोबरपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करण्यास मुदत दिली आहे. या आमदार अपात्रता याचिकेवर पुढील आठवड्यात निवाडा दिला शक्यता आहे. आता, आमदार अपात्रता याचिकेवरील निवाड्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सभापती रमेश तवडकर यांनी डॉम्निक नोरोन्हा यांची फुटीर आठ आमदारांच्या विरोधात दाखल केलेली आमदार अपात्रता याचिका फेटाळून लावल्यानंतर काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीला 14 ऑक्टोबरपासून सुरुवात केली.

कॉँग्रसचे नेते गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई, फर्नांडिस, आलेक्स सिक्वेरा यांच्याविरोधात नोव्हेंबर 2022 मध्ये आमदार अपात्रता याचिका दाखल केली आहे. या आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीच्या वेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे.

गोवा विधानसभा सभापतींकडून आमदार अपात्रता याचिकेवर सुनावणी घेतली जात नसल्याने गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गोवा विधानसभेचे सभापती घटनेच्या चौकटीत राहून निर्णय घेतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे सभापतींनी चोडणकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीला गती दिली.

सर्वोच्च न्यायालयात 4 रोजी सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात चोडणकर यांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवर येत्या 4 नोव्हेंबर 2024 दरम्यान सुनावणी होणार आहे. त्या याचिकेवरून सुनावणीच्या अगोदर चोडणकर यांच्या आमदार अपात्रता याचिकेवर निवाडा दिला जाण्याची शक्यता आहे.