अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखालील भंडारी समाजाची समिती बेकायदा नाही

0
2

गोवा खंडपीठाचा निवाडा

गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या नेतृत्त्वाखालील समिती ही बेकायदेशीर नसल्याचा निवाडा काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. तांत्रिक कारणावरून न्यायालयाने हा निवाडा रद्दबातल केला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर गोवा संस्था महानिरीक्षकांनी अशोक नाईक यांच्या नेतृत्त्वाखालील गोमंतक भंडारी समाजाची समिती ही बेकायदेशीर ठरवणारा निवाडा दिला होता. सदर निवाड्याला अशोक नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. वरील निवाड्यामुळे उपेंद्र नाईक गटाला धक्का बसला आहे. काही काळापासून गोमंतक भंडारी समाजातील दोन वेगवेगळ्या गटामतील वाद चिघळला आहे.

दरम्यान, काल उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यामुळे सत्याचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया अशोक नाईक यांनी दिली आहे. आपल्या अध्यक्षतेखालील समितीने सदैव समाजाच्या हितासाठी निर्णय घेतल्याचे अशोक नाईक यांनी म्हटले आहे. आम्ही भ्रष्टाचार केलेला नसून निवडणुका घेण्यास आम्ही तयार आहोत, असेही नाईक यांनी म्हटले आहे.

गोवा खंडपीठाने वरील प्रकरणी निवाडा देताना संस्था महानिरीक्षकांनी दिलेल्या निवाड्यातील मुद्द्यांवर खोलवर न जाता त्यातील तांत्रिक चुकांच्या आधारे निवाडा रद्दबातल ठरवला आहे. अशोक नाईक गटाला पाठवलेल्या नोटिशीत त्रुटी आहेत. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया करून निर्णय घ्यावा, असे नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता पुन्हा संस्था महानिरीक्षकांसमोर सुनावणी होणार आहे.