गुरुवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गच्या नागिन भागात नियंत्रण रेषेजवळ 18 राष्ट्रीय रायफल्सच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जवान शहीद झाले असून सैन्याला मदत करणाऱ्या एका पोर्टरचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात लष्कराचे 7 जवान जखमी झाले होते. त्यांना इस्पितळात दाखल केले असता त्यातील 3 जवानांचा मृत्यू झाला.
या हल्ल्यात 50 हून अधिक दहशतवादी सहभागी असू शकतात. त्याचवेळी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. उत्तर काश्मीरमधील बोटा पाथरी सेक्टरमध्ये एलओसीवरून दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असावी, असा अंदाज आहे.
दरम्यान, काल सकाळी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बटगुंडमध्ये दहशतवाद्यांनी आणखी एका मजुरावर गोळीबार केला होता, त्यात तो जखमी झाला होता. जखमी शुभम कुमार हा यूपीचा रहिवासी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्याचवेळी, गुरुवारी सकाळीच श्रीनगरमधील गनबाग परिसरात एका गैर-काश्मीरी तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत एमडी जाहूद हा पश्चिम बंगालचा रहिवासी होता. दहशतवादी हल्ल्यांसंदर्भात काल राजभवनात उच्चस्तरीय बैठकही झाली. त्यात उत्तर विभागाचे कमांडर, जम्मू-काश्मीरचे डीजीपी, कॉर्प्स कमांडर आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारी सहभागी झाले होते.