>> कृती दल समितीची पत्रकार परिषदेत माहिती
>> काही कामे नव्याने करण्याची व्यक्त केली गरज
कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामांचा दर्जा निकृष्ट आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कला अकादमीमधील त्रुटी दूर करण्याची गरज आहे. त्यामुळे कृती दल समितीने येत्या 10 नोव्हेंबर 2024 रोजी कला अकादमीचे काम केलेल्या कंत्राटदारांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कला अकादमी कृती दल समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे यांनी कृती दल समितीच्या पहिल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
कांपाल येथील ईएसजी संकुलातील परिषद सभागृहात कला अकादमी कृती दल समितीची पहिली बैठक अध्यक्ष विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली. या बैठकीच्या पूर्व दिवशी म्हणजेच सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी कृती दल समितीच्या सदस्यांनी कला अकादमीला भेट देऊन कला अकादमीतील विविध कामांची पाहणी केली होती. कला अकादमी कृती दल समितीच्या बैठकीत कला अकादमीतील एकंदर कामावर चर्चा करण्यात आली. कला अकादमीच्या नूतनीकरणाबाबत काही माहिती अधिकाऱ्यांना सादर करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली आहे.
वास्तूमध्ये भरपूर त्रुटी
कृती दल समितीने काल, कला अकादमीच्या पाहणी केलेल्या नूतनीकरण वास्तूमध्ये थोड्या त्रुटी असल्याचे सांगितले होते. पण, काल कृती दल समितीची बैठकीनंतर कला अकादमीमध्ये भरपूर त्रुटी आहेत, असे स्पष्टपणे सांगावे लागत असल्याचे सांगितले. कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम नित्कृष्ट दर्जाचे आहे. कृती दल समितीकडून या कामाला उत्तीर्ण होण्याएवढेसुद्धा गुण मिळणार नाहीत. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काही कामे पुन्हा नव्याने हाती घ्यावी लागणार आहेत. कला अकादमी पूर्वीप्रमाणे करण्यासाठी समितीकडून प्राधान्यक्रम दिला जाणार आहे, असेही अध्यक्ष विजय केंकरे यांनी सांगितले.
अकादमीत अनेक समस्या
कला अकादमीतील रंगमंच, वातानुकूलित यंत्रणा, ध्वनी यंत्रणा, छत गळती आणि इतर अनेक समस्या आहे. ही सर्व कामे सदोष आहेत. कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाबाबत चूक झाली आहे. चुकांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. कला अकादमीतील त्रुटी दूर करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन विविध कामे नव्याने करावी लागणार आहेत. त्यासाठी कला अकादमीतील कामे केलेल्या कंत्राटदारांची बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे, असेही केंकरे यांनी सांगितले.
भाजपकडून गोव्याची कला संपविण्याचा प्रयत्न ः पाटकर
मूळ गोव्याचे असलेले प्रसिद्ध रंगभूमी आणि चित्रपट व्यक्तिमत्व आणि वादग्रस्त कला अकादमी नूतनीकरण कामाच्या तपासकामासाठी नेमलेल्या कृती दलाचे अध्यक्ष, विजय केंकरे यांनी कला अकादमीचे काम निकृष्ट झाल्याचे सांगून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला भ्रष्टाचाराचे प्रमाणपत्र दिले. भाजप सरकारचे हे कृत्य कधीही माफ केले जाऊ शकत नाहीत. भाजपच्या भ्रष्ट लालसेने गोव्याची कला आणि संस्कृतीही नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.