कला अकादमीतील त्रुटी दूर करणे शक्य : विजय केंकरे

0
3

>> कृती दल समितीकडून पाहणी; आज होणार पहिली बैठक

कला अकादमीच्या ध्वनियंत्रणा, वातानुकूलित यंत्रणेत काही समस्या प्राथमिक पाहणीत आढळून आल्या आहेत. त्या समस्या उपाययोजना आखून सोडविल्या जाऊ शकतात, असे कला अकादमी कृती दल समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे यांनी कला अकादमीच्या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.

राज्य सरकारने गोवा कला अकादमीच्या इमारतीच्या नूतनीकरण प्रश्नी चौकशीसाठी विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या कृती दल समितीने काल पाहणी केली. मंगळवार दि. 22 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता ईएसजीच्या आवारात आयोजित पहिल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर कला अकादमीची नूतनीकरण केलेली इमारत आणि त्यातील साधनसुविधांची पाहणी करण्यात आली.

राज्यात कला अकादमीच्या नूतनीकरणाचा विषय गाजत आहे. सुमारे 75 कोटी रुपये खर्चून कला अकादमीच्या ध्वनियंत्रणा, प्रकाश योजना व इतर काही त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एका कृती समितीची नियुक्ती करून कला अकादमीची इमारत आणि साधनसुविधांचा आढावा घेऊन दर्जा वाढविण्यासाठी आवश्यक सूचना करण्याची जबाबदारी समितीकडे सोपविली आहे.

कृती दल समितीने पहिल्यांदाच कला अकादमीची पाहणी केलेी. त्यात विविध समस्या आढळून आल्या. या पाहणीत आढळून आलेल्या समस्या, त्रुटीबाबत समितीच्या मंगळवारच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे, असेही विजय केंकरे यांनी सांगितले.

कृती दल समितीकडून गोवा कला अकादमीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे काम केले जाणार आहे. कृती दल समितीच्या बैठकीत चर्चा करून कला अकादमीत सुधारणा करण्याबाबत शिफारशी सरकारकडे केल्या जाणार आहेत. कला अकादमीची पुन्हा एकदा पाहणी करून कामाचा आढावा घेतला जाणार आहे, असेही केंकरे यांनी सांगितले.

कला अकादमीतील त्रुटींचा आपणास प्रत्यक्ष अनुभव
कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर मुख्य रंगमंचावर आपण एक नाटक सादर केले होते. त्यावेळी ध्वनियंत्रणेमध्ये त्रुटी असल्याने आम्हाला बाहेरून आवश्यक ध्वनियंत्रणा आणावी लागली होती. रंगमंचावर नाटक सादर करताना प्रत्यक्षात कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले हे आपण अनुभवले आहे. मात्र ज्या काही त्रुटी आहेत, त्या दूर केल्या जाऊ शकतात, असेही विजय केंकरे यांनी सांगितले.