‘बेवारस’ भूखंड ताब्यात घेऊन सरकार करणार काय? : सरदेसाई

0
3

राज्यातील ज्या जमिनींचे कायदेशीर वारस नाहीत, अशा जमिनी ताब्यात घेऊन गोवा सरकार काय करणार आहे, असा संतप्त सवाल काल गोवा फॉरवर्डचे प्रमुख तथा आमदार आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

राज्य सरकारने गोवा विक्रीस काढला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या नावाने गावावांतील लाखो चौरस मीटर जमीन सरकार ताब्यात घेत आहे. प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामीण भागांतील निसर्गावर नांगर फिरवला जात आहे. हे सगळे थांबायला हवे; अन्यथा गोव्याचा विनाश होण्यास उशीर लागणार नसल्याचे सरदेसाई म्हणाले.

ज्या जमिनींचे वारस नाहीत, अशा जमिनी सरकार ताब्यात घेईल अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर काल विजय सरदेसाई हे माध्यमांशी बोलत होते.

मालक अथवा वारस नसलेल्या जमिनी ताब्यात घेऊन सरकार त्या जमिनीचे काय करणार आहे, हे सरकारने सांगावे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.
एका खासगी विद्यापीठासाठी सरकारने थिवी येथील लाखो चौरस मीटर जमीन देऊ केलेली असून, त्याला स्थानिक लोक विरोध करीत आहेत. आणि हा विरोध योग्यच असल्याचे सरदेसाई म्हणाले. लोकांना आपल्या गावाची, आपल्या भूमीची चिंता आहे म्हणूनच लोक विरोध करीत आहेत, असे सरदेसाई म्हणाले. त्यामुळे मालक आणि वारस नसलेल्या जमिनी ताब्यात घेऊन सरकार काय करणार आहे हे लोकांना कळायला हवे, असे सरदेसाई यांनी सांगितले.

जमिनी कोणाला देणार?
आता जसे सरकार राज्यभरातील जमिनी वेगवेगळ्या प्रकल्पांना देऊ पाहत आहे, त्याचप्रमाणे वारस नसलेल्या जमिनी ताब्यात घेऊन सरकार त्या जमिनी परप्रांतीय धनाढ्यांना प्रकल्प उभारण्यासाठी देणार आहे का, असा सवाल विजय सरदेसाई यांनी केला.