सेलिब्रिटींकडून गोव्यातील ‘सेकंड होम्स’चे हॉटेलमध्ये रुपांतर

0
3

>> अभिनेता अजय देवगणने मयड्यातील बंगला दिला भाडेपट्टीवर; दिवसाचे भाडे तब्बल 50 हजार रुपये

गोव्यात जमीन खरेदी करून तेथे आलिशान ‘सेकंड होम’ उभारणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींनी आता आपल्या ह्या ‘सेकंड होम’चे रुपांतर हॉटेलात करणे सुरू केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘सिंघम’ अशी ओळख असलेले अभिनेते अजय देवगण व त्यांची पत्नी अभिनेत्री काजोल यांनी उत्तर गोव्यातील मयडे येथील आपल्या आलिशान बंगल्याचे आता हॉटेलमध्ये रुपांतर केले असून, या मालमत्तेची जबाबदारी ताज समूहाकडे सोपवली आहे.

डोळे दिपून जावेत अशा ह्या बंगल्याचे नाव ‘व्हिला इटर्ना’ असे असून, एका रात्रीसाठी तेथे राहण्याचे भाडे हे तब्बल 50 हजार रुपये एवढे आहे. पोर्तुगीज वास्तुरचेनुसार उभारण्यात आलेल्या या बंगल्याला पाच खोल्या असून, तळमजल्यावर दोन खोल्या, एक मोठा भोजन कक्ष, बाजूला एक स्विमिंग पूल व सुंदर अशी बाग आहे, तर पहिल्या मजल्यावर तीन अलिशान बेडरुम आहेत. बंगल्याच्या परिसरात स्विमिंग पूल आणि बागही आहे. एकूणच बंगल्यातील सर्व माहौल हा एका पंचतारांकित हॉटेलासारखा आहे. बंगल्याच्या चहुबाजूला खूप हिरवळ असून बंगल्यातून निसर्गाचे नयनरम्य असे दर्शन घडत असल्याचे समाज माध्यमावरुन केल्या जात असलेल्या जाहिरातीतून स्पष्ट होत आहे. समाज माध्यमावर टाकण्यात आलेल्या छायाचित्रांत बंगल्याच्या आजूबाजूला मोठे वृक्ष असल्याचे दिसत आहे. त्यामुळे निसर्गरम्य अशा परिसरात असलेली वृक्षवल्ली व वन नष्ट करून हा बंगला बांधण्यात आला असल्याचे स्पष्ट होत आहे.

देवगण कुटुंबीय गोव्यात सुट्टीसाठी येतात, तेव्हा त्यांचे वास्तव्य याच बंगल्यात असते, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या बहुचर्चित व गाजलेल्या ‘सिंघम’ ह्या चित्रपटातील प्रमुख नायकाची भूमिका अजय देवगण याने साकारली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण हे प्रामुख्याने गोव्यात झाले असून, त्यानिमित्ताने तो गोव्यात आला असता येथील निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर त्याने गोव्यात हा आलिशान बंगला उभारला.
अन्य कित्येक सेलिब्रिटींचीही गोव्यात घरे व रेस्टॉरंट्स असून त्यात राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकार, क्रिकेटपटू यांचा समावेश आहे.

माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याने केळशी समुद्रकिनारी जमीन खरेदी केली असून, आपल्या मालमत्तेत बांधकाम करण्यासाठी तेथील झाडे बेकायदेशीररित्या कापण्याबरोबरच किनाऱ्यावरील वाळुच्या टेकड्या नष्ट केल्यामुळे तो चर्चेत आला आहे. नेहरा हा किनाऱ्यावर नेमके कसले बांधकाम करीत आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

> आता ह्या ‘व्हिला इटर्ना’ बंगल्याचे हॉटेलात रुपांतर करण्यासाठी देवगण कुटुंबीयानी हा बंगला आता ताज समुहाकडे सोपवला आहे. देवगण कुटुंबीयानी सुमारे 40 कोटी रुपये खर्चून हा बंगला उभारला आहे.

> भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यानेही आपल्या घराचे रुपांतर हॉटेलात केले असून, तुलनेने छोटा असलेल्या आणि 20 ते 25 कोटी रुपयांच्या बंगल्याचे एका रात्रीसाठीचे भाडे 11 हजार रुपये एवढे आहे.