श्रीराम साहित्य एक उद्बोधक प्रवास

0
3
  • तनया उमेश परब (मुळगाव, डिचोली)

विद्याप्रबोधिनी महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय परिसंवाद- श्रीराम साहित्य कार्यक्रम- अत्यंत लाभदायक व उपस्थितांना खुर्चीला खिळवून ठेवणारा असाच होता. हा कार्यक्रम संस्कृती भवन, पणजी येथे झाला. मी या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी उपस्थित होते.

सत्रातील प्रत्येक वक्ता रामायणातील अनेक पैलूंवर बोलत होता. ‘रामायण हे एकच आहे जे वाल्मीकीने लिहिले. त्यानंतर विद्वानांनी लिहिलेल्या रामायणास आपण ‘रामकथा’ म्हणायचे.’ ‘रामायणातील तत्त्वज्ञान व नैतिकता’ या घटकावर भाष्य करताना वक्ता म्हणाला की, प्रत्येक मनुष्य विवेकशीलतेने आपल्यात चांगले गुण आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते नक्कीच शक्य होईल आणि याची प्रेरणा आपण वाल्मिकी ऋषींकडून घ्यायला हवी. आपले विचार बदलतात तसा आचार बदलतो. रामासारखे सम्राट राजे असावे. प्रजेच्या मनात ज्या काही अपेक्षा आहेत त्यांचे समाधान राजाला करायला हवे. सरकारनेदेखील असेच असावे. लोकांकडून जो कर घेतला जातो त्यांचा वापर लोककल्याणाकरिता करायला हवा, जेणेकरून लोकांच्या मनात सरकारविरुद्ध अढी राहणार नाही.

रामाला मानायची आवश्यकता नाही तर जाणून घेण्याची गरज आहे. रामायण भारताचा इतिहास आहे; ते मिथक नव्हे! भारतीय संस्कृती धर्म, कर्तव्य घेऊन पुढे जाते. रामायण ही त्या काळची रचना आहे. रामाचे वनगमन, त्याचा वनवास, राम कुठे कुठे राहिला असेल, वनगमनावेळी कोण कोण भेटले व वनगमनाची वैशिष्ट्ये मी समजून घेतली.

श्रीलंका देशातील काही स्थळांची चित्रे यावेळी दाखवण्यात आली. जसे की रावण धबधबा, रावण गुहा, अशोकवाटिका इ. सीतेला अशोकवाटिकेत ठेवण्यात आले होते, ते आता अभयारण्य आहे. इथे गाड्यांची काहीच सुविधा नाही. घनदाट जंगल… मग सीता त्याकाळी कशीकाय एकटी राहिली असेल? हे पाहिले की अक्षरशः रडायला येते. सीतामातेने दिवस कसे काढले असतील इथे?
मानसिक स्वास्थ्य, आयुर्वेद, पर्यावरण याबाबतचे व रामायणातील विविध अंगांचे दर्शन यावेळी घडवून आणले गेले. त्याकाळी वैद्यकीय दृष्टिकोन, विज्ञान ही क्षेत्रे कशी होती? त्यानुसार आधुनिक काळाने काय शिकायला हवे? काय बदलाव आणायला हवेत? याचे व्याख्यान दिले गेले. एक श्रोता म्हणून बुद्धिमत्तेत बरीच नवीन भर पडली. अनेक मुद्द्यांचे आकलन प्रथम दिवशीय सत्रातून मला वक्त्यांकडून झाले.

मला विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असल्यामुळे वक्ते काय काय बोलतील यांची नोंद ठेवण्याच्या हेतूने पाठवले गेले होते. कार्यक्रम कसा होईल याची थोडीफार माहिती दिलेली, पण वक्ते राम साहित्यावर काय बोलतील हे माहीत नव्हते. पण सत्रास सुरुवात करण्यात आली आणि एकंदर दृष्टिकोनच बदलला. कार्यक्रम अत्यंत लाभदायक तसेच मनोरंजक होता. मी त्या नवीन वातावरणात सहज मिसळून गेले. त्या वातावरणात कसली खंत वाटली नाही. हा श्रीराम साहित्य राष्ट्रीय परिसंवाद अविस्मरणीय असाच होता.

व्याख्यानामुळे विचार करण्याच्या दिशेला नवीन आयाम मिळाला आहे. आपण प्राचीन साहित्य वाचताना कोणकोणत्या अनुषंगाने वाचले पाहिजे, आकलन केले पाहिजे, याचे मार्गदर्शन या परिसंवादातून मिळाले. प्राचीन भारतीय साहित्य हे आधुनिक काळातील खजिना म्हणून आपण वापरू शकतो. आपण रामायण ग्रंथाला बोध प्राप्तीसाठी, आमच्या विचारांना नवीन आयाम देण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचले पाहिजे असे मला वाटते.