झारखंडमध्ये एनडीएचे जागावाटप जाहीर

0
2

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवारी भाजप आणि ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनने ( एजेएसयू) रांची येथील प्रदेश भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि जागावाटपाची घोषणा केली. झारखंडमधील 81 जागांपैकी 68 जागांवर भाजप निवडणूक लढणार आहे. उर्वरित 10 जागांवर, एजेएसयू 2 जागांवर जेडीयू आणि एलजेपी (रामविलास गट) ला 1 जागा देण्यात आली आहे.

झारखंडमध्ये भाजप, एजेएसयू, जेडीयू आणि एलजेपी रामविलास एकत्र निवडणुका लढवतील. आम्ही एकत्र प्रचार करू, असे केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे निवडणूक प्रभारी शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी, एजेएसयूचे प्रमुख सुदेश महतो उपस्थित होते.

झारखंडमध्ये 13 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. झारखंड विधानसभेत 81 जागा आहेत. त्यामध्ये 44 जागा सर्वसाधारण प्रवर्ग, 28 जागा अनुसूचित जाती आणि 9 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.