पुरात वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

0
7

साईनगर-उसगाव येथे बुधवारी संध्याकाळी मुसळधार पावसामुळे ओहोळाला आलेल्या पुरात पाचवीतील विद्यार्थी वाहून गेला. दर्शन नार्वेकर या मुलाचे नाव आहे. संध्याकाळी 4-5 विद्यार्थ्यांसह ट्युशननंतर घरी परतताना ही दुर्घटना घडली. बुधवारी रात्री उशिरपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला होता; मात्र तो सापडू शकला नव्हता. त्यानंतर गुरुवारी दुपारी एमआरएफ कंपनीजवळ दूधसागर नदीत बेपत्ता दर्शन नार्वेकर या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला.

सविस्तर माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी ट्युशन घेतल्यानंतर माघारी परतत असताना घराकडे जाताना वाटेत असलेल्या ओहोळातील पाण्याची पातळी मुसळधार पावसामुळे वाढली होती. ओहोळातील पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने दर्शन नार्वेकर याचा पाय घसरला, त्यावेळी त्याच्या बहिणीने त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अन्य काही विद्यार्थ्यांनी देखील एकत्रितपणे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर तो वाहून गेला. यानंतर सदर माहिती फोंडा पोलीस व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फोंडा अग्निशमन दलाचे अधिकारी सुशील मोरजकर व पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन बेपत्ता दर्शनचा शोध घेण्यात सुरुवात केली. मात्र बुधवारी रात्री उशिरापर्यंत तो सापडू शकला नव्हता. गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास एमआरएफ कंपनीच्या मागच्या बाजूने असलेल्या दूधसागर नदीजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.