रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमात मोठा बदल

0
3

भारतीय रेल्वेने तिकिटांचे आरक्षण करण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता रेल्वेचे तिकीट फक्त 60 दिवस आधी बुक करता येईल. याआधी प्रवासाच्या तारखेच्या 120 दिवस आधी तिकीट बुक करता येत होते. हा नवा नियम येत्या 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबरपर्यंत झालेल्या आरक्षणावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेण्यामागील कारण स्पष्ट केलेले नाही.

ज्या रेल्वे गाड्यांच्या बुकिंगचा कालावधी आधीपासून कमी आहे, अशा गाड्यांना हा नियम लागू असणार नाही. विदेशी पर्यटकांना रेल्वेचे बुकिंग करण्यासाठी 365 दिवसांचा कालावधी असून, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

120 दिवसांमुळे लोकांना तिकीट बुक करण्यासाठी आणि ते कन्फर्म होण्यासाठी बराच वेळ मिळत होता. आता 60 दिवसांचा कालावधी करण्यात आल्याने प्रवाशांना थोडी अडचण होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला प्रवासाच्या चार महिने आधी करण्यात आलेले बुकिंग अनेकदा रद्द केले जातात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. आता 2 महिने आधी बुकिंग केल्याने तिकीट रद्द होण्याची शक्यता कमी होऊ शकेल असा अंदाज आहे.