अवैध वास्तव्य प्रकरणी 2 विदेशी महिला अटकेत

0
1

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने अवैध वास्तव्य प्रकरणी युगांडातील दोन महिलांना हरमल-पेडणे येथून काल अटक केली. गोवा पोलिसांनी अवैध वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. हरमल पेडणे येथे पार्किंगच्या जागेत उभ्या असलेल्या दोन विदेशी महिलांची चौकशी केली असता त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. कॅथरीन नाकावुका (38) आणि नातुकुंदा सुझान नलुईमा (26) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा महिलांची नावे आहेत. त्या दोघीही हरमल परिसरात राहत होत्या, असे पोलीस तपासात आढळून आले आहे. त्यांच्याकडे पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कोणतीही प्रवासी कागदपत्रे नव्हती. त्या दोघांच्या अटकेची सूचना युगांडाच्या वाणिज्य दूतावासाला देण्यात आली आहे. त्यांना 10 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश पेडणे प्रथम श्रेणी न्यायालयाने दिला आहे.